EPFO चा मोठा निर्णय, जमा पैशांपैकी 5% ‘या’ फंडात गुंतवले जाणार, फायदा काय होणार?
InvITs हा पर्यायी गुंतवणूक निधीचा एक प्रकार आहे, जो म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करतो. InvITs चे नियमन सरकारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा SEBI द्वारे केले जाते. InvITs अंतर्गत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपन्या मालमत्तेची कमाई करतात, ज्यामुळे मोठा निधी गोळा होतो.
नवी दिल्लीः केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) शनिवारी 20 नोव्हेंबरला मोठा निर्णय घेतलाय. EPFO च्या वार्षिक ठेवीपैकी 5 टक्के रक्कम इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट InvITs सह पर्यायी गुंतवणुकीत गुंतवली जाणार आहे, असा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. शनिवारी होणार्या बैठकीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, कारण त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. किमान पेन्शनची रक्कम आणि पीएफचे व्याजदर वाढविण्यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान, पर्यायी निधीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. EPFO च्या केंद्रीय मंडळाने त्याला परवानगी दिलीय.
पर्यायी निधीमध्ये गुंतवणूक करण्यास हिरवा सिग्नल
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुनील भरतवाल म्हणाले, मंडळाने पुढे जाण्यासाठी पर्यायी निधीमध्ये गुंतवणूक करण्यास हिरवा सिग्नल दिलाय. सद्यस्थितीत केवळ सरकार समर्थित पर्यायी निधीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये InvIT सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील निधीचा समावेश होतो. यामुळे EPFO च्या गुंतवणुकीत विविधता येईल. पण यातही एक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, जे नेहमी लक्षात ठेवावे लागेल.
सरकारने यापूर्वीच परवानगी दिली
या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) मध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिली होती. पण त्याची अधिसूचना मार्चमध्ये जारी करण्यात आली होती, जेव्हा EPFO बोर्डाची शेवटची बैठक झाली होती. ईपीएफच्या तिजोरीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मानले जात आहे. लोक संघटित क्षेत्रात सामील होत असल्याने पीएफची सेवा असलेल्या ईपीएफओच्या तिजोरीत वाढ झाल्याने गुंतवणुकीत विविधता आणण्याचा विचार करण्यात आलाय. हे पाहता सरकारी पर्यायी निधीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतेय. ईपीएफओला याचा फायदा होईल, पीएफ खातेधारकांना त्याच्या गुंतवणुकीवर परतावा मिळू शकेल.
InvITs फंड म्हणजे काय?
InvITs हा पर्यायी गुंतवणूक निधीचा एक प्रकार आहे, जो म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करतो. InvITs चे नियमन सरकारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा SEBI द्वारे केले जाते. InvITs अंतर्गत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपन्या मालमत्तेची कमाई करतात, ज्यामुळे मोठा निधी गोळा होतो. InvITs व्यतिरिक्त SME फंड देखील Alternative Investment Fund मध्ये येतात. यामध्ये सामाजिक उपक्रम निधीचा समावेश आहे, जो SEBI द्वारे नियंत्रित केला जातो. असे मानले जाते की, EPFO चे केंद्रीय विश्वस्त मंडळ फक्त सरकारी गुंतवणूक निधीकडे लक्ष देईल. सध्या खासगी फंडातील गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची शक्यता कमी आहे.
ईपीएफओची बैठक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO विश्वस्त मंडळाची 229 वी बैठक शनिवारी होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO च्या बोर्ड मिटिंगचा मुख्य अजेंडा EPFO च्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा विस्तार, EPF व्याजदरात वाढ आणि कर्मचारी पेन्शन स्कीम किंवा EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 ते 3,000 रुपये वाढवणे असू शकते.
भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील EPF व्याजदर 8.50 टक्क्यांच्या 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये EPFO ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील EPF व्याजदर 8.50 टक्क्यांच्या 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला होता. हा EPF व्याज दर 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अपरिवर्तित ठेवण्यात आला होता. शनिवारी (20 नोव्हेंबर) होणाऱ्या बैठकीत EPFO बोर्ड आर्थिक वर्ष 2021-22 साठी EPF व्याजदरावर चर्चा करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे EPFO जास्त EPF व्याजदर जाहीर करून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील परतावा वाढवू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवली
7th Pay Commission: नोव्हेंबरमध्ये 4 महिने जोडून मिळणार थकबाकी, DA-DR मध्ये चांगली वाढ