नवी दिल्ली : ग्राहकांना सलग दुसऱ्या महिन्यात दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. देशातील चार महानगरात गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे जेवढे दर होते. तेवढेच या महिन्यात राहणार आहेत. म्हणजे या महिन्यातही घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे राहणार आहेत. मार्च महिन्यात मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचे दर बदलले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात हे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे.
देशातील चार महानगरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिल्ली. कोलकाता, आणि मंबईतील गॅस सिलिंडरचे दर 171.5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1856.50 रुपये, कोलकातामध्ये 1960.50 रुपये आणि मुंबईत 1808.50 रुपये झाले आहेत. चेन्नईत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 171 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 2021.50 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत एलपीजीचे दर 1103 रुपये आहेत. ते तसेच राहणार आहेत. तर कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1129 रुपये आणि मुंबईतील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1102.50 रुपये एवढी आहे. चेन्नईत सिलेंडरची कीमत 1118.50 रुपये असणार आहे.
मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांना वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन महिने कोणतीच दरवाढ करण्यात आली नाही. येणाऱ्या काही महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. मात्र, या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. तर कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात 171 रुपयांची कपात केली आहे. त्याचा फायदा पटनापासून ते रांची, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यातील नागरिकांना होणार आहे.