Reliance Industries : मोठी बातमी! रिलायन्स इंडस्ट्रीज आता सेमीकंडक्टर उद्योगात
Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीज आता सेमीकंडक्टर उद्योगात उतरणार असल्याच्या चर्चांना बाजारात उधाण आले आहे. भारत सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी केंद्र सरकारने खास प्रयत्न केले आहेत. सध्या फॉक्सकॉन, वेदांता आणि इतर कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत.
नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आता सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. देशात चिप आणि सेमीकंडक्टरची मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता रिलायन्स या संधीचे सोने करण्याची शक्यता आहे. कोरोना काळात देशात चिप आणि सेमीकंडक्टरचा मोठा तुटवडा आला होता. त्याचा परिणाम कार उत्पादनासह इतर क्षेत्रावर दिसून आला. चीनमध्ये कोरोनाने कहर केला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून आला. त्यामुळे भारताला सेमीकंडक्टर हब (Semiconductor Manufacturing Hub) करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परदेशी कंपन्यांशी चर्चा
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादनात उतरणार आहे. त्यासाठी रिलायन्स परदेशी कंपनीशी बोलणी करत आहे. यासंबंधी चर्चा सुरु आहे. या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी टेक्नॉलॉजी पार्टनर्स असतील. वृत्तानुसार, चिप मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कंपनीला उतरायचे आहे. पण त्यासाठी निश्चित अशी कालमर्यादा आखण्यात आलेली नाही. या क्षेत्रात रिलायन्स गुंतवणूक करण्याच्या विचारात असली तरी अजून त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. चिप उत्पादनात अग्रेसर असलेल्या काही कंपन्यांशी रिलायन्स चर्चा करत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. या कंपन्या कोणत्या आहेत, याचा खुलासा झालेला नाही.
सध्या एकही प्रकल्प नाही
केंद्रातील मोदी सरकारने भारतात चिप उत्पादनाला वाव दिला आहे. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकार कधीचाच प्रयत्न करत आहे. पण त्याला अजूनही गती मिळालेली नाही. केंद्र सरकार चिप उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा विचार करत असली तरी देशात एकही प्रकल्प सुरु झालेला नाही. त्यामुळे भारतात अशा प्रकल्पांचा श्रीगणेशा कधी होईल, याकडे केंद्र सरकार आणि कार उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागले आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचे मार्ग वेगळे
वेदांता आणि फॉक्सकॉनचे मार्ग वेगळे झाले आहे. चिप उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या अगोदरच दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतात अजून प्रकल्प सुरु झालेला नाही. चिपचा तुटवडा पाहता रिलायन्स कंपनीला या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे. 2021 मध्ये चिपचा तुटवडा असल्याने कंपनीने गुगलसोबत स्वस्तातील स्मार्टफोन आणण्याची योजना आखली होती. पण ही योजनेला विलंब झाला. भारतासह जगात सध्या चिपचा मोठा तुटवडा जाणवत आहे.