Big Rent : बिहारी बाबूची कमाल, किरायातून 769 कोटी रुपयांची कमाई
Big Rent : अनेक जणांना प्रश्न पडतो की ही आयडियाची कल्पना असते तरी काय? या बिहारी बाबूने ही आयडियाची कल्पना काय असते ते दाखवून दिले. डोक्यालिटीचा वापर करत केवळ किरायातून ही व्यक्ती 769 कोटी रुपये कमावतो.
नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : अनेक जणांना प्रश्न पडतो की ही आयडियाची कल्पना असते तरी काय? या बिहारी बाबूने ही आयडियाची कल्पना काय असते ते दाखवून दिले. जर तुम्ही एखादी गोष्ट करायचीच असं मनाशी पक्क करतात, तेव्हा अनेक अडथळे आले तरी यश मिळतेच. बिहारमधील मध्यमवर्गातील बिजय अग्रवाल (Bijay Agrawal) यांनी त्यांची अनेक स्वप्न साकरली आहेत. 5000 रुपये पगाराची नोकरी करत असताना त्यांनी उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आज ते 5000 कोटींचे मालक आहेत. डोक्यालिटीचा वापर करत केवळ किरायातून (Big Rent ) ते 769 कोटी रुपये कमावतात. हैदराबाद येथील एका बिल्डिंगच्या माध्यमातून त्यांना प्रति महिना 4.14 कोटी रुपये मिळतात.
कोण आहे बिजय अग्रवाल
सत्व ग्रुपचे (Sattva Group) व्यवस्थापकीय संचालक बिजय अग्रवाल हे बिहारमधील छोट्या शहरातून आले आहेत. ते बिहारमधील किशनगंजचे रहिवाशी आहेत. तसे ते मुळचे बांगलादेशातील. 1965 मध्ये त्यांचे वडील किशनगंजमध्ये आले होते. बहिणीचे लग्न झाले. तिच्यासोबतच ते पश्चिम बंगालमधील राजीगंजमध्ये गेले.
व्यवसाय घेतला समजून
भावजींचा एक छोटा व्यवसाय होता. त्यात ते मदत करु लागले. त्यांनी व्यावसायिक गुण शिकले. मार्केटिंगपासून ग्राहकांना कसे ओळखायचे हे याचे तंत्र ते शिकले. 1985 मध्ये ते कोलकत्ता येथे गेले. त्यांनी एक वित्त कंपनीत नोकरी केली. ही कंपनी बिल्डर्सचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करत होती. याठिकाणी त्यांनी बांधकाम व्यवसायचे गुण आत्मसात केले.
स्वतःची कंपनी केली सुरु
1993 मध्ये त्यांनी गुरु जी डी सलारपुरिया यांच्यासोबत बेंगळुरु येथे पहिला प्रकल्प पूर्ण केला. 2000 मध्ये त्यांनी अनेक छोटे-मोठे प्रकल्प सुरु केले. येथून त्यांनी यशाला गवसणी घातली. दोघांनी मिळून सलारपुरिया-सत्वा ग्रुप (Salarpuria-Sattva group) सुरु केला. 2021 मध्ये ICRA च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कंपनीने 55.4 कोटी चौरस फुटचे बांधकाम पूर्ण केले होते. 2021 पर्यंत त्यांच्या कंपनीला कार्यालय भाडेतत्वावर देऊन 761 कोटी रुपयांची कमाई झाली होती.
भाड्यातूनच मोठी कमाई
कंपनीने अनेक मालमत्ता उभ्या केल्या. अनेक बिल्डिंग बांधल्या. या व्यावसायिक इमारतींमध्ये अनेक मोठंमोठ्या कंपन्यांनी त्यांची कार्यालये थाटली. यामध्ये JPMC, मायक्रोसॉफ्ट (Microsoft), Novartis, गुगल (Google) अशा कंपन्या भाडेकरु आहेत. काही कार्यालये भाडेतत्वावर तर काही लीजवर देण्यात आली आहे.
इतके नेटवर्थ
बिजय अग्रवाल यांची नेटवर्थ 2021 साली 4170 कोटी रुपये होती. एका छोट्या शहरातून त्यांनी जिद्दीने सुरु केलेला हा प्रवास त्यांना यशाचा वाटेकरी करुन गेला. 5 लोकांसह त्यांनी कंपनी उभी केली. आज त्यांच्या कंपनीत 1600 कर्मचारी काम करतात.