नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत आहे. आम्ही घराणेशाही दूर केली. आमच्याकडे पारदर्शिकता आहे. सामाजिक आर्थिक बदल व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. शेतकऱ्यांचं कल्याण ही आमची प्राथमिकता आहे. गरीबांना सशक्त करण्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला गरीबी दूर करायची आहे, असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पातून दिलं.
निर्मला सीतारामन यांनी बरोबर 11 वाजता संसदेत बजेट सादर केला. बजेटचं वाचन करताना सीतारामन यांनी विरोधकांना फटकारेही लगावले. आम्ही घराणेशाही दूर केल्याचं त्या म्हणाल्या. तसेच आमच्या सरकारच्या प्रयत्नामुळे जनतेचाविकास होत आहे. गरीबी दूर होताना दिसत आहे. देशातील युवक वर्ग हे आमच्या आकांक्षाचं केंद्र आहे. आम्हाला वर्तमानाचा अभिमान आहे. तर उज्जवल भविष्यासाठीच्या आशा आणि विश्वास आहे. आम्ही जोरदार काम केलं आहे. त्यामुळे आमच्या कामाच्या आधारेच लोक आम्हाला जोरदार कौल देतील, अशी आशा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षात सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळालं आहे. भारतीय लोक आशावादी आहेत. आशावादानेच भविष्याकडे पाहत असतात. लोकांच्या आशीर्वादामुळेच 2014मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आलो. सबका साथ, सबका विकासचा मंत्र घेऊन आम्ही सर्व अडचणींचा सामना करायला सज्ज झालो. सरकारने या आव्हानांवर नियंत्रणही मिळवलं, असा दावाही त्यांनी केला. गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता शेतकरी यांच्या आकांक्षा आणि गरजा भागवणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यावर आमचा सर्वोच्च भर आहे, असंही त्या म्हणाल्या.
विकास कार्यक्रमात सर्वांना घर, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज आणि सर्वांना घरगुती गॅस आणि विक्रमी काळात सर्वांची बँकेत खाती देण्यावर आम्ही भर दिला होता. आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशी आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेने काम करत आहे. आमच्या देशातील तरुणांच्या प्रचंड आकांक्षा आहेत, असंही त्या म्हणाल्या. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत प्रचंड बदल झाला आहे. 2014पासून आम्ही आव्हानांचा सामना पूर्ण करत आहोत. त्या आव्हानांना सामोरे जाताना विकास करण्यावरही आमचा भर होता. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.