बायजूच्या अडचणीत वाढ, ईडीने FEMA अंतर्गत केला तपास, आवळणार फास
Byju's ED | ईडीनुसार, कंपनीने या काळात परदेशातून प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या नावावर जवळपास 9754 कोटी रुपये परदेशात पाठवले. कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली जवळपास 944 कोटी रुपये खतवले आहेत.यामध्ये परदेशातील खर्चाचा पण सहभाग आहे. ई़डीने फेमा कायद्यातंर्गत तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : देशातील सर्वात मोठी हाय-प्रोफाईल स्टार्टअप्स कंपन्यांपैकी एक बायजूचा पाय खोलात आहे. सक्तवसूली संचालनालयाने, ईडीने Byju’sविरोधात फेमातंर्गत तपास सुरु केला. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये कंपनीने 9 हजार कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणात ईडीने बायजूला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने नोटीस मिळाल्याचे नाकारले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ईडीने बायजूशी संबंधित सर्व संस्थांची चौकशी सुरु केली होती. तपास आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान अनेक सदोष कागदपत्रे आणि डिजिटल डेटा समोर आला.
बायजू हा लोकप्रिय ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. ईडीने कंपनीवर छापे टाकले. त्यावेळी कंपनीत 2011 ते 2023 या कालावधीदरम्यान जवळपास 28000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणात सखोल तपास सुरु आहे. कंपनीने 9 हजार कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाकडे शैक्षणिक जगतासह सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
काय केले खुलासे
ईडीने याविषयीची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, कंपनीने या कालावधीत परदेशी थेट गुंतवणुकीच्या नावाखाली परदेशात जवळपास 9754 कोटी रुपये पाठवले. कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली 944 कोटी रुपये जमा केले. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 पासून त्यांचे आर्थिक ताळेबंद तयार केलेला नाही. खात्यांचा ताळेबंद मांडलेला नाही. कंपनी म्हणून कायद्यान्वये त्यांना या गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक होते. त्यामुळे कंपनीने जे दावे आणि आकडे सादर केले आहेत. त्याचा बँक खात्यातील आकडेवारीशी पडताळा करुन पाहण्यात येत आहे.
बायजूची हजेरी नाही
खासगी व्यक्तींनी केलेल्या तक्रारीनंतर बायजूविरोधात तपास सुरु केल्याचे ईडीने स्पष्ट केले. ईडीने बायजूचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन बायजू यांना अनेक समन्स पाठवले. पण त्यांनी ईडीच्या समन्सला महत्व दिले नाही. त्यांनी नेहमी चालढकल केली. ते अद्याप चौकशीला सामोरे गेले नाहीत.
आरोपांच्या फैरी
या स्टार्टअपवर देणेकऱ्यांनी (Lenders) एका फंड हाऊसमध्ये 53.3 कोटी डॉलर लपविल्याचा गंभीर आरोप यापूर्वी केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी पुन्हा बाजारातून भांडवल जमा करुन देणेकऱ्यांची परतफेड करण्याची हमी भरली होती. पण आता या ताज्या आरोपामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. बाजारातही कंपनीची पत खालवल्याने सगळीकडून एकदाच कंपनीवर संकट येऊन कोसळली आहे.