कोरोनाच्या दुसऱ्या लाटते राज्यात सर्वाधिक दारू विक्री, गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड तोडला; तरीही महसुलात घट
गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा उद्योगधंद्याला बसला. उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांनी आपला रोजगार गमावला. मात्र दुसरीकडे दारू विक्रीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मुंबई : गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा उद्योगधंद्याला बसला. उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांनी आपला रोजगार गमावला. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) सारख्या राज्यांना बसला. महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने परिस्ंथिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये राज्यात दारूची मोठ्याप्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्याप्रमाणात दारूची विक्री झाली. प्राप्त आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात तब्बल 17,177 कोटी रुपयांपेक्षा अधिक दारूची विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा आकडा 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 2,358 लाख बल्क लीटर दारूची विक्री झाली आहे.
…तरीही महसुलात घट
याबाबत बोलताना महाराष्ट्र एक्साइज डिपार्टमेंटच्या वतीने सांगण्यात आले की, 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये दारूची विक्री मोठ्याप्रमाणात झाली. दारू विक्रीचे हे प्रमाण मागील तीन आर्थिक वर्षांपेक्षा अधिक होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दारूची विक्री झाली, आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 17 टक्क्यांनी दारूची विक्री वाढली. मात्र दारू विक्री वाढून देखील दारूतून मिळणाऱ्या महसूल वसुलीचे टारगेट पूर्ण झाले नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दारूच्या विक्रीमधून 18 हजार कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे टारगेट ठेवण्यात आले होते. मात्र यातील 95 टक्केच टारगेट पूर्ण झाले आहे.
तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक दारू विक्री
एक्साइज डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राज्यात 2,157 लाख बल्क लिटर दारूची विक्री झाली होती. मात्र त्यानंतर राज्यात कोरोनाने शिरकाव केल्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेत दारू विक्रीत घट झाली होती. त्यामुळे आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये दारू विक्रीचा आकडा 1,999 लाख बल्क लीटरवर पोहोचला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दारू विक्रीत पुन्हा एकदा वाढ झाली. या काळात तब्बल 2,358 लाख बल्क लीटर दारूची विक्री झाली. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2020-2021 च्या तुलनेमध्ये 17 टक्क्यांनी अधिक होते. याच काळात बियरच्या विक्रीत देखील वाढ झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या
आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये
केंद्र सरकारचा कापड उद्योगाला मोठा दिलासा; कापसाच्या आयातीवरील कस्टम ड्यूटी माफ करण्याचा निर्णय
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 9 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर