डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानींचा जगातील 100 श्रीमंतांमध्ये समावेश, 1.42 लाख कोटींचे मालक
ब्लूमबर्ग बिलेयनिअर्स इंडेक्सनुसार, दमानी आता 1.43 लाख कोटी (19.3 अब्ज डॉलर)च्या संपत्तीसह जगातील 97 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या 18 महिन्यांत त्यांची संपत्ती 1 मार्च 2020 रोजी 12 अब्ज डॉलर्सपासून जवळजवळ 60 टक्क्यांनी वाढून आता 19.3 अब्ज डॉलर झाली.
नवी दिल्लीः डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रवर्तक आणि मालक राधाकृष्ण दमानी जगातील पहिल्या 100 श्रीमंतांच्या यादीत सामील झालेत. ब्लूमबर्ग बिलेयनिअर्स इंडेक्सनुसार, दमानी आता 1.43 लाख कोटी (19.3 अब्ज डॉलर)च्या संपत्तीसह जगातील 97 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या 18 महिन्यांत त्यांची संपत्ती 1 मार्च 2020 रोजी 12 अब्ज डॉलर्सपासून जवळजवळ 60 टक्क्यांनी वाढून आता 19.3 अब्ज डॉलर झाली.
एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये 61 टक्के वाढ
गेल्या एक वर्षात एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये 61 टक्के वाढ झाली. कंपनी कोविड 19 साथीच्या प्रभावापासून जवळजवळ सावरली. डी-मार्ट कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडद्वारे चालविली जाते. कंपनीला 115.13 कोटींचा निव्वळ नफा झाला. यासोबतच महसुलातही 31 टक्के वाढ झाली.
1001 कोटींचा बंगला केला खरेदी
यंदा राधाकृष्ण दमानींनी मुंबईच्या मलबार हिल्समध्ये 5752,22 चौरस मीटरचे आलिशान घर खरेदी केले. त्यांनी ही मालमत्ता 1001 कोटी रुपयांना खरेदी केली. दमानी आणि प्रवर्तक समूहाचा एव्हेन्यू सुपरमार्टमध्ये 74.90 टक्के हिस्सा आहे. दमानीची आणखी काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे, ज्यामुळे त्यांना निव्वळ मूल्य साध्य करण्यात मदत झाली. इंडिया सिमेंटमध्ये 11.3 टक्के, व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये 26 टक्के, सुंदरम फायनान्समध्ये 2.4 टक्के हिस्सा आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर शेअर बाजारात प्रवेश
मीडिया आणि हेडलाईन्सच्या जगापासून नेहमीच दूर राहिलेल्या राधाकृष्ण दमानी यांना अनेक लोक ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ असेही म्हणतात. खरं तर ते मुख्यतः पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घालतात. सुरुवातीच्या काळात बॉल बेअरिंगच्या दुकानात काम करून त्यांना फारसा फायदा झाला नाही. मारवाडी कुटुंबातून आलेल्या दमानींने वडिलांच्या मृत्यूनंतर भावासह शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं प्रशिक्षण घेतले. आज ते त्यांच्या विशेष गुंतवणूक रणनीतीसाठी देखील ओळखले जातात.
डी-मार्ट 2002 मध्ये लॉन्च
दमानी यांनी 90 च्या दशकातच शेअर बाजारातून कोट्यवधी रुपये उभे केले होते. गेल्या वर्षीच त्यांची संपत्ती इतकी वाढली होती की, ते मुकेश अंबानींनंतर देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर बसले होते. दीर्घकाळ स्टॉक मार्केटर म्हणून काम करणाऱ्या दमानी यांनी 2002 मध्ये रिटेल मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली. मुंबईत पहिले रिटेल स्टोअर उघडणाऱ्या दमानींचा रिटेल व्यवसाय झपाट्याने वाढला.
डी-मार्टचा आयपीओ मार्च 2017 मध्येच सुरू
बऱ्याच काळापासून किरकोळ बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या दमानी यांनी अत्यंत अचूक नियोजनासह डी-मार्ट लाँच केले. डी-मार्टचा आयपीओ मार्च 2017 मध्येच सुरू झाला. हा आयपीओ डी-मार्टची मूळ कंपनी ‘एव्हेन्यू सुपरमार्ट्स’ ने सुरू केला होता. 299 रुपये प्रति शेअर ऑफर असलेल्या या कंपनीचे स्टॉक 604 रुपयांवर सूचीबद्ध केले गेले. बुधवारी एव्हेन्यू सुपरमार्टचा स्टॉक 3651.55 रुपयांवर बंद झाला.
संबंधित बातम्या
टाटा स्टील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 270.28 कोटी रुपयांचा बोनस मिळणार
लाखो पेन्शनधारकांच्या हातात अधिक पैसे येणार, सर्वोच्च न्यायालय मोठ्या निर्णयाच्या तयारीत
D-Mart founder Radhakrishna Damani among 100 richest people in the world, worth Rs 1.42 lakh crore