महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याआधीच ट्विटरवरुन फुटला?
"आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात. मात्र, आम्ही सकारात्मक कामासाठी वापरत आहोत."
मुंबई : राज्याच अतिरिक्त अर्थसंकल्प ट्विटरवरुन फुटल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहात एकच गदारोळ केला. तसेच, अर्थसंकल्प ट्विटरवरुन फुटणं म्हणजे सभागृहाचा अपमान असून, सरकारने सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
“राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाउंटवरुन फुटला आहे. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी.” असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.
“सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा. सरकारकडून सभागृहाचा अपमान झालाय. सरकारनं यावर माफी मागावी. जर ट्विट केलं असतं तर समजू शकतं, पण ज्या जाहिराती झाल्यात, त्यानुसार मुनगंटीवार यांच्या टीमकडे आधीच अर्थसंकल्प गेला होता, हे इतिहासात कधीच घडलं नाही.” – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
कुठल्या ट्विटमुळे विरोधकांचा आरोप?
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या @SMungantiwar या ट्विटर हँडलवरुन अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट टाकले जात आहेत. त्यातील “मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. 3 हजार 182 कोटी 28 लक्ष 74 हजार तरतूद #MahaBudget2019” ही घोषणा अर्थमंत्र्यांनी विधिमंडळात सांगण्याआधीच ट्विटरवर पोस्ट करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री @SMungantiwar यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटलाय. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी. @CMOMaharashtra #MonsoonSession pic.twitter.com/VYj61Q9hz5
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 18, 2019
मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले?
“अलिकडच्या काळात कॉम्प्यटरवर सर्व व्यवस्था असते. सर्व फॉरमॅट तयार असतात. टीव्हीवर वाचल्यावर ते टाईप होतात. शिवाय, अर्थमंत्र्यांकडून होणारं अर्थसंकल्पाचं वाचन आणि ट्विटरवरील ट्वीट यात किमान 15 मिनिटांचं अंतर आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात. मात्र, आम्ही सकारात्मक कामासाठी वापरत आहोत, त्यामुळे टीका करु नये, असेही मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले.