तलाव, प्रायव्हेट पूल रूम आणि काय काय… 8,000 कोटीचा लक्झरी प्रोजेक्ट; ‘या’ शहराने मुंबई, दिल्लीला टाकले मागे
आम्ही आज एका लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पाविषयी. नव्हे नव्हे! स्वर्गाविषयीच माहिती देणार आहोत. DLF गुरुग्राममध्ये 'द डहालियास' नावाचा नवीन अल्ट्रा-लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प विकसित करणार आहे. यासाठी 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. गुरुग्रामने आता दिल्ली आणि मुंबईला मागे टाकले आहे आणि भारतातील सर्वात महागडे रिअल इस्टेट मार्केट बनले आहे.
भारताच्या रिअल इस्टेट इतिहासातील सर्वात महागड्या प्रकल्पाविषयी आज आम्ही माहिती देणार आहोत. हा प्रकल्प आर्थिक राजधानी मुंबईत किंवा दिल्लीत नसून गुरुग्राममध्ये आहे. लक्झरी प्रकल्प नव्हे स्वर्गच म्हणता येईल. DLF गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर ‘द डहालियास’ हा आणखी एक शानदार प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प कंपनीचे टॉप सीईओ आणि उच्च नेटवर्थ व्यक्ती राहत असलेल्या ‘द कॅमेलियास’च्या समोर असेल. या महागड्या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घ्या.
सर्वात मोठी रियल्टी कंपनी असलेली DLF गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवरील ‘द डहालियास’ प्रकल्पाची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावरुन असं म्हणलं जातंय की, गुरुग्रामने आता दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला देखील मागे टाकले आहे, गुरुग्राम भारतातील सर्वात महागडे रिअल इस्टेट मार्केट बनले आहे.
लक्झरी प्रकल्पात कोणत्या सुविधा मिळणार?
‘द डहालियास‘ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना 2 लाख चौरस फुटांचे क्लबहाऊस मिळणार आहे. हे क्लबहाऊस कॅमेलियासच्या क्लबहाऊसपेक्षा दुप्पट मोठे आहे. यात खासगी थिएटर, पोकर रूम, बॉलिंग गल्ली, पूल रूम, इनडोअर टेबल टेनिस, स्क्वॅश कोर्ट, मसाज रूम, स्पा, आईस बाथ, 2 पूल, कोल्ड ब्लँप आणि हॉट डुबकी अशा सुविधा असतील.
टेनिस, बास्केटबॉल कोर्ट, कृत्रिम तलावही
‘द डहालियास’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना मैदानी सेक्शनमध्ये टेनिस, बास्केटबॉल कोर्ट सारख्या क्रीडा सुविधाही असतील. याशिवाय कृत्रिम तलावाचा ही आनंद घेता येणार आहे.
400 सुपर लक्झरी अपार्टमेंट
‘द डहालियास’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी DLF 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात 17 एकर जागेवर सुमारे 400 सुपर लक्झरी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत. अपार्टमेंटचा आकार 9 हजार 500 चौरस फूट ते 16 हजार चौरस फूट असेल. तर सरासरी आकार 11 हजार चौरस फूट असेल.
किंमत 80 हजार रुपये प्रति चौरस फूट
‘द डहालियास’ या प्रकल्पाच्या लक्झरी अपार्टमेंटची किंमत 80 हजार रुपये प्रति चौरस फूट असेल. त्यानुसार प्रत्येक फ्लॅटचे सरासरी तिकीट आकार सुमारे 100 कोटी रुपये असेल. अलीकडेच DLF चे व्यवस्थापकीय संचालक अशोक त्यागी यांनी बाजार तज्ज्ञांशी कॉन्फरन्स कॉलमध्ये संवाद साधला.
अशोक त्यागी यांनी सांगितले की, सध्याच्या लाँचपूर्व किंमतींच्या आधारे गुरुग्राममधील या नवीन सुपर-लक्झरी प्रकल्पातून कंपनीला 26 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातील अपार्टमेंटचा किमान आकार 10 हजार 300 चौरस फूट आहे.