Gold Salary: हीच खरी सोन्यासारखी नोकरी! पगार म्हणून पैसे नाही तर सोनं देतात, आहे की नाही भारी?
Salary in Gold : लंडन मधील या कंपनीच्या कर्मचा-यांचे नशीब मात्र छप्पर फाडके उघडले आहे. कारण येथील वरिष्ठ कर्मचा-यांना रोखीत नव्हे तर सोन्याच्या रुपात वेतन देण्याचा प्रघात सुरु झाला आहे.
सध्या महागाईने (Inflation) अनेकांचे गणितं साफ कोलमडली आहेत. खर्च वजा जाता, उर्वरीत रक्कमेला पगार म्हणावा की नाही अशी अवस्था असताना लंडन (London) मधील एका कंपनीने मात्र कर्मचा-यांना सोन्याहून पिवळं केले आहे. भारतातही गुजरातमधील हिरे कंपन्यांच्या मालकांनी कर्मचा-यांना एकाचवेळी चारचाकी, घरे देण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या मुलींचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले आहे. पण लंदनमधील टेलीमनी या कंपनीने अजून एक पाऊल पुढे टाकत वरिष्ट कर्मचा-यांना वेतनात रोख रक्कम न देता सोने देण्यास सुरुवात केली आहे. टेलीमनी ही वित्तीय सेवा (Finance Service) प्रदान करणारी लंदनमधील संस्था आहे. स्थानिक व्यापार समाचार पत्र सिटी ए. एम.च्या अहवालानुसार, टेलीमनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमरन पैरी यांनी याविषयीचा निर्णय लागू केला आहे. लवकरच या कंपनीतील सर्वच कर्मचा-यांचे वेतन सोन्यात देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईत आणि मुद्रा धोरणाच्या परिणामांपासून कर्मचा-यांना सुरक्षा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पैरी यांनी सांगितले. पारंपारिक चलन या मुद्रास्थितीत त्याची क्रयशक्ती हरवत असताना त्याजागी कर्मचा-यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा पैरी यांनी केला आहे.
पाऊंट घटले, सोने वधरले
पैरी यांनी केलेला दावा खराच आहे. कारण इंग्लंडचे चलन पाउंड याचे मूल्य झपाट्याने कमी होत आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या किंमती ब-याच वधरल्या आहेत. त्यामुळे कंपनीने कर्मचा-यांच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय अगदी योग्य आणि हितरक्षण करणारा आहे. मोकळ्या जखमेवर हा उपाय म्हणजे मलम लावण्यासारखा आहे. सध्या कंपनीकडे एकूण 20 कर्मचारी आहेत.
सध्या सोन्याचे वेतन करण्याचा निर्णय वरिष्ठ कर्मचा-यांसाठी लागू करण्यात आला आहे. परंतू, कंपनी केवळ एवढ्यावर थांबणार नाही, संपूर्ण कर्मचा-यांसाठी हा निर्णय लागू करण्याची योजना कंपनीने तयार केली आहे. स्थानिक दैनिकानुसार, पैरी स्वतः त्यांचे वेतन सोन्यात घेत आहेत. पैरी यांच्या म्हणण्यानुसार, पाउंड आणि पेंसमध्ये विक्री होणा-या वस्तू आणि सेवांसाठी सोन्याआधारित मूल्य देण्यात येते, तेव्हा त्याची किंमत अजून वाढते.
सोने बॅगेत भरून घरी नेत नाही
ही कंपनी सोन्यात वेतन देते, याचा अर्थ ते काही किलोने मोजून देत नाही. अथवा कंपनी सोन्याचे बिस्किट कर्मचा-यांना देत नाही. तर काय करते. तर कंपनी कर्मचा-यांना वेतन देताना पाउंड मधून सोन्याचे मूल्य करते आणि तेवढी रक्कम कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करते.
कर्मचा-यांना रोखीने पाउंडमध्ये वेतन हवे असल्यास कर्मचारी हा पर्याय ही निवडू शकता. त्यासाठी त्यांना आडकाठी नाही. दरम्यान बँक ऑफ इंग्लंडने इशारा दिला आहे की, 2022 हे वर्ष इंग्लंडमध्ये मंदीचे वर्ष ठरु शकते.