पीएफमधून आता किती पैसे काढता येणार?; केंद्र सरकारचा मोठा निर्णय काय?

| Updated on: Sep 19, 2024 | 8:26 PM

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील तमाम सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ईपीएफओमधील पैसे काढण्याच्या रकमेच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरजेसाठी आता कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम काढता येणार आहे.

पीएफमधून आता किती पैसे काढता येणार?; केंद्र सरकारचा मोठा निर्णय काय?
Employees' Provident Fund
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जर तुम्ही पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वैयक्तिक गरजांसाठी पीएफमधून काढण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा सरकारने वाढवली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची माहिती दिली. ईपीएफओच्या ग्राहकांना आता पर्सनल कारणासाठी आता आपल्या खात्यातून एकावेळी 1 लाख रुपये काढता येणार आहे. या आधी ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत होते. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

कामगार मंत्रालयाने ईपीएफओच्या संचालनामध्ये अनेक बदल केले आहेत. त्यात लवचिकता आणि उत्तरदायित्व आणलं आहे. ग्राहकांची असुविधा कमी करण्यासाठी नवीन डीजिटल रचना करण्यात आली आहे. नव्या कर्मचाऱ्यांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी नव्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले आहेत. ते आता पीएफची रक्कम काढू शकतात. त्यामुळे लाखो नव्या कर्मचाऱ्यांना या अटीचा फायदाच होणार आहे.

सरकारचं म्हणणं काय?

लग्न आणि आरोग्याशी संबंधित कामासाठी लोक नेहमी ईपीएफओमधील बचतीचा सहारा घेतात. त्यामुळेच आम्ही पैसे काढण्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली आहे. कारण खर्चातील बदल झाल्याने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. पैसे काढण्याची जुनी मर्यादा ही आता भूतकाळात जमा झाली आहे. लोकांच्या गरजेच्या तुलनेत 50 हजार रुपयांची रक्कम अत्यंत कमी पडत होती, असं मांडविया यांनी सांगितलं.

प्रोव्हिडंट फंड संघटित क्षेत्रात 10 मिलियनहून अधिक कर्मचारी रिटायरमेंट उत्पन्न प्रदान करतात. पीएफ हा अनेकांच्या जीवनभराच्या कमाईचा प्राथमिक स्त्रोत असतो. ईपीएफओचा वित्तीय बचत व्याज दर आर्थिक वर्ष 2024साठी 8.25 टक्के निर्धारित करण्यात आला आहे. नोकरदार मध्यमवर्गांसाठीचा हा एक बेंचमार्क आहे.

देशात 17 अशा कंपन्या आहेत की ज्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,00,000 एवढी आहे. आणि 1,000 कोटीचा फंड आहे. त्यांना आपल्या स्वत:च्या फंडाऐवजी ईपीएफओमध्ये स्वीच व्हायचं असेल तर त्यांना परवानगी दिली जाणार आहे. सरकार पीएफ बचतीवर अत्यंत चांगल्या प्रकारे रिटर्न देते. त्यामुळे अनेक कंपन्यांसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे.