शेअर बाजारात व्हा लिटिल वॉरेन बफे! लहान मुलांना करता येते गुंतवणूक
Share Market | आता लहान वयात शेअर बाजाराची बाराखडी शिकता येईल. गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते उघडण्याचा मार्ग खुला झाला आहे. पूर्वी पण काही ब्रोकर्स ही व्यवस्था करत होते. अर्थात या सर्व व्यवहारांवर पालकांचे बारकाईने लक्ष असेल. कदाचित तुमची मुलं पण लिटिल वॉरेन बफे होऊ शकतील.
नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : विना डिमॅट खाते उघडता, शेअर, म्युच्युअल फंड, ईटीएफ आणि बाँडमध्ये गुंतवणूक करता येत नाही. जर एखाद्या पालकाला मुलांच्या नावे शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्याला अल्पवयीन मुलांसाठी असलेले मायनर डिमॅट अकाऊंट उघडावे लागेल. लहान मुलांचे हे डिमॅट खाते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उघडता येते. चला तर जाणून घेऊयात लहान मुलांचे डिमॅट खाते कसे उघडता येते, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात. त्याची प्रक्रिया काय आहे ते?
डिमॅट खाते उघडण्याचे वय
डिमॅट खाते उघडण्यासाठी वयाचे तसे बंधन नाही. कोणत्याही वयातील व्यक्तीला डिमॅट खाते उघडता येते. शेअर बाजारात त्याला गुंतवणूक करता येते. लहान मुलांना आई-वडिलांच्या देखरेखीखाली डिमॅट खाते उघडता येते. आई-वडिलांच्या नावाच्या आधारे लहान मुलांना पण डिमॅट खाते उघडता येते. त्यांच्या खात्याला जोड खाते तयार करता येते.
या कागदपत्रांची आवश्यकता
लहान मुलांच्या नावाने डिमॅट खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये आई-वडिलांच्या पॅनकार्डची, पत्त्यासाठी आधार कार्डची, वाहन परवान्याची वा इतर कागदपत्रांची आवश्यकता असते. याशिवाय लहान मुलाचा जन्म दाखला, सेबी केवायसी आणि लहान मुलाच्या बँक खात्याची आवश्यकता असते.
या गोष्टी पण आवश्यक
- लहान मुलाच्या नावे डिमॅट खाते उघडण्यासाठी आई-वडिलांची स्वाक्षरी गरजेची आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खाते उघडण्यासाठी स्वाक्षरीची गरज आहे
- डिमॅट खात्यासाठी लहान मुलाचा आणि आई-वडिलांचे छायाचित्र आवश्यक
- केवायसी, पीएमएलटी आणि एफएटीसीए करणे पालक आणि लहान मुलांना दोघांसाठी बंधनकारक
थेट शेअरची नाही करता येणार खरेदी
शेअर, म्युच्युअल फंड आणि ईटीएफ गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात डिमॅट खात्याची गरज असते. हे खाते असले की शेअर बाजारात व्यवहार करता येतात. पण लहान मुलांना थेट बाजारात शेअरची खरेदी वा विक्री करता येत नाही. 1872 च्या भारतीय करार कायद्यान्वये त्याला मनाई आहे. पालक याबाबतीत निर्णय घेऊ शकतात.