Banking Frauds: काय सांगता ! बँकांना चूना लावण्याचे प्रकार घटले, 100 कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकीत लक्षणीय घट
Banking Frauds: बँकिंग क्षेत्रातील 100 कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकीत लक्षणीय घट झाली आहे, बँकांनी मागील वर्षीच्या 1.05 ट्रिलियनच्या तुलनेत FY22 मध्ये 41,000 कोटी रुपयांची प्रकरणे नोंदवली आहेत.
बँकांना चूना लावण्याच्या (Bank Fraud) प्रकारात लक्षणीय घट झाली आहे. बँकांना सायबर भामटेच नाही तर अनेक बड्डे व्यापारी आणि उद्योजक चूना लावतात आणि नामनिराळे होतात. अर्थात यात बँकेतील बड्या अधिका-यांचा हात असतो. कारण त्यांच्या मदतीशिवाय कोट्यवधीचे फसवणुकीचे प्रकार सहज करता येत नाहीत. पण या प्रकारात लक्षणीय घट आली आहे. बँकिंग क्षेत्रातील (Banking Sector) 100 कोटींहून अधिक रकमेच्या फसवणूक प्रकारात ही घट पाहण्यात आली. गेल्या वर्षीच्या 1.05 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 2021-22 मध्ये बँकांनी 41,000 कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या 2020-21 मध्ये 265 वरून या आर्थिक वर्षात( FY22) 118 वर घसरली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) एकूण 100 कोटींहून अधिक फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या आर्थिक वर्ष (FY) 2021 मध्ये 167 वरून 80 वर घसरली, तर खाजगी क्षेत्रातील कर्जदारांसाठी अशी प्रकरणे आर्थिक वर्ष 22 मध्ये 98 वरून 38 पर्यंत कमी झाली आहेत.
तंत्रज्ञान आले दिमतीला
साठवलेल्या रक्कमेच्या घोटाळ्यात ही घट दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी आर्थिक वर्ष 21 मध्ये हा घोटाळा 65,900 कोटी होता. तो आकडा यंदा 28,000 कोटींवर आला आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये ही घट प्रकर्षाने दिसून आली. गेल्या वर्षीच्या 39,900 कोटी रुपयांवरून यंदा हा आकडा 13,000 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. फसवणूक थोपवण्यासाठी आरबीआयने अर्ली वॉर्निंग सिस्टम (EWS) फ्रेमवर्क सुरु केली होती. त्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात आले. फसवणूक टाळण्यासाठी मार्केट इंटेलिजेंस (MI) युनिटचा वापर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने माहिती तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT) च्या सहकार्याने निवडक व्यावसायिक बँकात EWS फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीवर अभ्यास केला. त्याचा परिणाम घोटाळा होण्यापूर्वीच त्याची साशंकता येण्यात आणि तो थांबविण्यासाठी उपाययोजनात करण्यात फायदा झाला.
ही फसवणूक प्रकरणे गाजली
या वर्षाच्या सुरुवातीलाच फसवणुकीचा बॉम्ब पडला होता, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 22,842 कोटी रुपयांची सर्वात मोठी बँक फसवणूक झाली होती. हा घोटाळा ABG शिपयार्ड आणि त्याच्या प्रवर्तकांनी केला होता. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने लावलेल्या चून्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. नीरव मोदीने पीआयबीला 14,000 कोटी रुपयांचा चूना लावला आहे. गेल्या महिन्यात, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक धीरज वाधवान आणि इतरांविरुद्ध 34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.