मुंबई : भारतात सोने-चांदीचे भाव घसरण्याचे सत्र सुरुच आहे. दिल्ली सराफ बाजारात आज सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 371 रुपयांवर पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने याबाबत माहिती दिली. याआधी सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 48 हजार 831 रुपयांपर्यंत घसरला होता. सोनेपाठोपाठ चांदीचाही दर घसरला आहे. हा दर 629 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर 62 हजार 469 प्रती किलोवर येवून पोहोचला आहे. याआधी हा दर 63 हजार 98 रुपये प्रती किलो इतका होता (Gold and silver price decreased again).
“दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 460 रुपयांनी घसरली आहे. यावरुन सोन्याच्या जागतिक किंमतीत झालेली घसरण आणि रुपयाच्या किंमतीत झालेली सुधारणा लक्षात येते”, अशी प्रतिक्रिया एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी दिली (Gold and silver price decreased again).
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रतीऔंस 1830 डॉलरपर्यंत घसरली. तर चांदीची किंमत प्रतीऔंस 23.82 डॉलरपर्यंत घसरली. शेअर मार्केटमध्ये सुरु असलेल्या व्यवहारांमुळे रुपयाची किंमत 9 पैशांनी वाढली. त्यामुळे रुपयाची किंमत प्रती डॉलर 73.55 रुपयांवर पोहोचली आहे. विदेश बाजारात डॉलरचा भाव कमी झाल्याने रुपयाची किमत वाढली आहे.
भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत थेट 48 हजार 371 रुपयांपर्यंत घसरली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे.
कोणत्याही गुंतवणुकीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केव्हा खरेदी करायची आणि केव्हा विकायची हे ठरवणे. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “गेल्या सत्रात डॉलरच्या दरात वाढ झाली. नव्या कोरोना प्रकरणांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणीही वाढली. मात्र, कोरोना लसीच्या प्रगतीमुळे आणखी नफा वाढू शकतो, त्यामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवरील सोने डिसेंबर फ्युचर्समध्ये सुमारे 48 हजार 600 रुपयांनी विकले गेले. त्यामुळे 49 हजार रुपये स्टॉपला ठेवा आणि प्रती दहा ग्रॅम 48 हजार रुपयांचे लक्ष्य ठेवा. गुंतवणूक करण्यापूर्वी दैनंदिन बदलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे”, असं अनुज गुप्ता यांनी सोने विक्रेत्यांना आवाहन केलं.
हेही वाचा : सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?