राज्यभरात गुढीपाडवा सणाचा उत्साह आहे. चैत्रातली सोनेरी पाहाट आज झालीय. मराठी नव्या वर्षाला सुरुवात झालीय. सर्वात अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात मोठमोठ्या शहरांमध्ये स्वागत यात्रा काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव, मराठमोळ्या साजमध्ये बाईक रॅली, संपूर्ण वातावरण मराठमोळं झालंय. गुढीपाडवाचा या उत्साहाने आनंदाचा रेकॉर्ड मोडला आहे. घरोघरी आज पुरणपोळी आणि आंब्याचा रसाचा बेत आहे. तर भारतीय शेअर मार्केटमध्येही प्रचंड मोठी तेजी आलेली बघायला मिळाली आहे. शेअर मार्केटमध्ये तर गुंतवणूकदारांच्या फायद्याचा संपूर्ण रेकॉर्ड मोडला गेला आहे. तर दुसरीकडे सोने आणि चांदीच्या दरातही प्रचंड मोठी भाववाढ झालेली आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने पहिल्यांदाच तब्बल 75000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर बँक निफ्टीमध्ये प्रचंड मोठी तेजी बघायला मिळाली असून निफ्टीचा आकडा थेट 48000 आकड्यांच्या पार गेला आहे. त्यामुळे शेअर मार्केटच्या गुंतवणुकदारांचा आनंदाचा पारा राहिलेला नाही. एकीकडे गुढीपाडव्याचा आनंद आहे तर दुसरीकडे काहीसं हिरमोडही आहे. कारण सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीय.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी हौसेला मोर नसतं आणि त्यासोबतच आज हिंदू नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून जळगावच्या सुवर्ण नगरी सोने खरेदी करण्यासाठी आज सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून दररोज सोन्याच्या भावात वाढ होत आहे. तसेच आजही या सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षी याच दिवशी सोन्याचे दर 58 हजार रुपये एवढे होते.
सोन्याचा दरात मागील वर्षांपेक्षा 22 टक्के भाववाढ होऊन हा भाव आज 71 हजार 500 तर GST सह 74000 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. तर चांदीचा दर 82 हजार असून GST सह 84 हजार गेला आहे. असे असले तरी गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त असल्याने ग्राहकांनी आज सकाळपासूनच रेलचेल दिसून येत आहे. तरी आज गुढीपाडव्या निमित्त शुभ मोहर्तावर सोने खरेदी करायला आलो असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे भाव वाढले आहेत. तर दुसरीकडे अमेरिका, चीन, जपान या देशांमध्ये आर्थिक मंदी असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या भाव वाढीवर झाला असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
लग्न सराईतच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्न म्हटलं म्हणजे सोने, चांदीचे दागिने आलेच. लग्न साईतमध्ये सोने, चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढते. त्यामुळे सोने, चांदीची भाव हा प्रचंड वाढतो. विशेष म्हणजे आताच भाव हा 70 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचा भाव आणखी नवा रेकॉर्ड तर करणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.