मुंबई: चालू आठवड्याच्या सुरुवातीपासून तेजीत असणाऱ्या सोन्याचा दर गुरुवारी घसरताना दिसला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात (Gold) 0.41 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर चांदीचा दरही 0.64 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सोने 192 रुपयांनी स्वस्त होऊन प्रतितोळा 46,880 रुपयांच्या पातळीवर आले आहे. तर चांदीचा आजचा दर प्रतिकिलो 67,494 रुपये इतका आहे. चांदीची किंमत गुरुवारी 438 रुपयांनी घसरली. (Gold and Silver price today)
आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवू शकते. त्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर पाहायला मिळू शकतो.
गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला होता. मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर मंगळवारीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.
बुधवारी ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला. तर ऑगस्ट वायद्यासाठीच्या चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. रुपयांमध्ये आकडेमोड करायची झाल्यास आज MCX वर सोन्याचा दर 65 रुपयांनी वाढून प्रतितोळा 47,076 रुपयांवर पोहोचला होता.
संबंधित बातम्या:
सरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार
PHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट
Gold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार? इंधनाची किंमत किती वाढणार? वाजा तज्ज्ञांची मतं