नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. त्यानंतर सोन्याचे दर उच्चांकावर गेले. उच्चांकी झेप घेतल्यानंतरही सोने आता घसरले आहे. वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्यात घसरण झाली आहे. सोने सर्वकालीन 58,800 रुपयाच्या किंमतीवर पोहचले. त्यात आता 2,300 रुपयांची घसरण झाली आहे. ( Gold Price Today) गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव 3.23 टक्क्यांनी कमी झाले आहे.
का घसरताय भाव
सोन्याचा वाढता भाव लक्षात घेता, येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. यूएस फेड आणि बहुतेक युरोपियन मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच यूएस डॉलरचे दर 10 महिन्यांच्या नीचांकीवरून सुधारले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. हा भाव 1,930 डॉलर प्रति औसवर होता.
चांदीची चमक फिकी
चांदीने ग्राहकांची चांदी केली होती. गेल्या काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण होत होती. 3 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 73800 रुपये होता. 4 फेब्रवारी रोजी त्यात 2600 रुपयांची घसरण होत 71200.00 झाला असल्याचे गोल्ड रिर्टन वेबसाईटने दिले आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांदीचा दर 74700 रुपये झाला होता.
सोन्याची शुद्धता कोण ठरवतात
भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.
अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढे कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. त्यानुसार भाव ठरतात.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.