Gold Rate : 2 वर्षांत सोने सर्वात महाग, या 8 कारणांमुळे भाव आणखी भडकणार, खरेदीदारांना मोजावे लागतील इतके रुपये
Gold Rate : सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. येत्या काही दिवसांत किंमती अजून भडकण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. सोन्याचा भाव (Gold Price) गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. तर चांदीचा भाव (Silver Price) 70 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. याची अनेक कारणे सांगण्यात येत आहे. यामध्ये अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणांचा मोठा प्रभाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हसह (American Federal Reserve) डॉलर निर्देशांक, रुपयांची घसरण, मंदी ही कारणेही आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येईल. त्यामुळे सोन्याचा भाव 60 हजारांच्या पुढे जाईल असा दावा करण्यात येत आहे.
- नवीन वर्षांत सोने झाले 755 रुपयांनी महाग
- 30 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 55,017 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
- 4 जानेवारी 2023 रोजी सोन्याचे दर 55,772 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
- या आठवड्यात सोन्याचा भावात 755 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले
- आज सकाळी 10:32 वाजता सोन्याचा भाव 2 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला
- आज चांदीचा भाव 70 हजार रुपये प्रति किलोवर पोहचला
- चांदीच्या किंमतीत 238 रुपये प्रति किलोग्रॅम वृद्धी दिसून आली
- आज सकाळी 10:32 वाजता चांदीच्या किंमती 70,155 रुपये प्रति किलोग्रॅम होत्या
- 30 डिसेंबर रोजी चांदीची किंमत 69,413 रुपये प्रति किलो होती
- आतापर्यंत चांदीच्या किंमतीत 787 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली
- अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक धोरणांचा परिमाम सोन्याच्या किंमतींवर दिसून आला. अमेरिकन केंद्रीय बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरत्या वर्षात सातत्याने व्याजदर वाढ केली. त्यामुळे कर्जे महाग झाली. वस्तूंच्या किंमती वाढल्या. सोन्याच्या किंमतीवरही या धोरणाचा परिणाम झाला.
- अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणानंतरही डॉलर निर्देशांकात घसरण दिसून आली. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवसात डॉलर इंडेक्स 105 होता, नवीन वर्षात त्यात घसरण झाली. डॉलर इंडेक्स 104 वर पोहचला.
- रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. जागतिक पातळीवर त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय निवडण्यात येत आहे. परिणामी सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत.
- जगभरातील केंद्रीय बँकांनी सध्या सोने खरेदीचा आणि साठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसत आहे.
- भारतीय रुपयाचा आपटी बार झाल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन झाले. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 81 वरुन 83 झाला. आयातीचा खर्च वाढल्याने देशातंर्गत सोन्याच्या किंमती वाढल्या.
- जगभरात मंदीच्या चर्चेने ही सोन्याच्या किंमती वाढविण्यास हातभार लावला. गेल्या आठ महिन्यांपासून मंदी येणार असल्याच्या चर्चा झडल्या. अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये मंदीचा परिणाम दिसण्याची शक्यता असल्याने त्याचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला.
- देशात सध्या लग्नसराईचे पर्व आहे. तुळशी विवाहनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होतात. त्यामुळे घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. फेब्रुवारीपर्यंत सोन्याच्या किंमतीत आणखी वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- चीनमध्ये कोविडने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येत असल्या तरी सोन्याची मागणी मात्र जोरात आहे. चीनमध्ये नवीन वर्षात ही सोन्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती भडकल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update