सोन्याचा मोह सोडवेना; सोन्याची मागणी 50 टक्क्यांनी वाढली, भारतात सोन्याची मागणी 797.3 टनांवर
भारतीयांचे सोन्यावरचे अमीट प्रेम कोरोना काळात तसूभर ही कमी झाले नाही. भारतीयांना सोन्याचा मोह काही केल्या सोडवत नाहीये. सोन्याच्या मागणीत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सोन्याची मागणी 797.3 टनांवर पोहचली आहे.
मुंबई : भारतीयांचे जीवन जणू पिवळंधम्मक झाले आहे. कोरोना काळात सर्वच क्षेत्राला जबरी फटका सहन करावा लागला. सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात वेग मंदावला. मात्र सोन्याच्या भावात आणि मागणीवर (Gold Rate and Demands) परिणाम होईल तर शपथ ! उलट कोरोना (Corona) काळात सोन्याला झळाळी आली. सोन्याच्या भावाने रेकॉर्ड तोडले. 30 हजारी मनसबदार असलेल्या सोन्याने पार 55 हजारांची मजल गाठली. त्यानंतर सोने 50 हजारांच्या जवळपास स्थिरावले आहे. मजल-दरमजल न करता सोन्याच्या भावाने हनुमान उडी घेतली. असे असले तरी सोन्याची मागणी काही केल्या कमी होत नाही. भारतीय स्त्रीयांचे दागिण्यावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. तसेच गुंतवणुकीसाठीचा पहिला पर्याय म्हणून भारतीय सोन्याला आज ही पसंती देत आहे. जागतिक स्तरावर चीन नंतर भारतातच सोन्याला झळाळी आहे. कोरोना काळातही भारतीयांनी सोन्यात गुंतवणूक करणे थांबवले नाही. कोरोना काळात जागतिक बाजारातI (international Market) सोन्याच्या मागणीत 50 टक्क्यांनी वाढ झाली.आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी 4 हजार 21 टनांपर्यंत पोहचली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भारतातही सोन्याची मागणी वाढली असून ती 797.3 टनांवर पोहोचली आहे.
परिस्थिती पूर्वपदावर
कोरोना काळात सोन्याच्या खरेदी-विक्रीत मोठा परिणाम दिसून आला. 2020 मध्ये सोन्याच्या मागणीत घट दिसून आली. त्यावेळी मागणी 3,658.8 टन होती. मात्र देशातंर्गत सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. अचानक सोन्याच्या भावांनी 2019 नंतर उसळी घेतली. त्यामुळे सोन्याचे भावाने खूप मोठा पल्ला गाठला. मागणी घटल्याने आणि कराच्या ओझ्यामुळे दरवाढ अटळ झाली. सरकारच्या काही धोरणांना सराफा व्यापा-यांनी विरोध केला. त्यानंतर कोविड-19 सोबत लढण्यासाठी लसींचे हत्यार उपलब्ध झाले. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आली. सोन्याच्या मागणीत वाढ झाली. याविषयी गोल्ड डिमांड ट्रेंडस 2021 या अहवालात माहिती देण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे या मौल्यवान पिवळ्या धातूचे दिवस आजून पालटल्याचे अहवालात सांगण्यात आले. प्रामुख्याने चीन आणि भारतात दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. 2021 च्या दुस-या तिमाहीनंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली. ही मागणी 1,146.8 टन झाली. 2019 च्या दुस-या तिमाही नंतर ही सर्वात मोठी मागणी होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील मागणीपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त आहे.
बँकांकडून मोठी खरेदी
2021 च्या शेवटच्या तिमाहीत सोन्याच्या विटा आणि नाण्यांची मागणी 1,180 टन होती, जी गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. अहवालात म्हटले आहे की, सलग 12 व्या वर्षी केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी केली. त्यांनी 463 टन सोने खरेदी केले, 2020 वर्षाच्या तुलनेत ही खरेदी 82 टक्के जास्त आहे.
दागिन्यांच्या मागणीत 96% वाढ
ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे 2021मध्ये भारतातील सोन्याची मागणी 797.3 टनांवर पोहोचली आहे.
सोन्याची मागणी 2021 मध्ये 76.6 टक्क्यांनी वाढला आणि मागणी 797.3 टन झाली आहे. 2020 मध्ये सोन्याची मागणी 446.4 टन होती.
कोरोना अथवा इतर कोणतेही मोठे संकट न कोसळल्यास सोन्याची मागणी 800 ते 850 टन राहण्याची शक्यता आहे.
तर दागिन्यांची मागणी 96 टक्क्यांनी वाढून 2,61,140 कोटी रुपये झाली आहे. 2020 मध्ये ही मागणी 1,33,260 कोटी रुपये होती.
इतर बातम्या :
प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका
Salary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
डिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक