Gold Hallmarking: केंद्र सरकार दागिन्यांच्या हॉलमार्किंगचा ‘हा’ नियम पुन्हा बदलणार?
Gold Hallmarking | केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी गोयल यांच्यासमोर हॉलमार्क यूनिक आईडेंटिफिकेशन नंबर (HUID) आणि इतर तक्रारी मांडल्या. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून HUID संदर्भात तोडगा काढण्यासाठी एखादी समिती स्थापन होऊ शकते.
मुंबई: केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सोन्याचे जुने दागिने हॉलमार्क करवून घेण्यासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते. देशभरात 15 जूनपासून हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यावेळी जुन्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग बंधनकार करण्यात आले होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा ऐकून आता केंद्र सरकारकडून जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 31 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देऊ करेल, असे सांगितले जात आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी गोयल यांच्यासमोर हॉलमार्क यूनिक आईडेंटिफिकेशन नंबर (HUID) आणि इतर तक्रारी मांडल्या. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून HUID संदर्भात तोडगा काढण्यासाठी एखादी समिती स्थापन होऊ शकते.
व्यापाऱ्यांच्या तक्रारी काय?
16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
सध्याच्या HUID प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे. हॉलमार्किंगची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?
सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.
BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.
भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही