अबब…सोनं चक्क दीड लाखांपर्यंत जाणार? गुंतवणूक करावी की थांबावं? ‘गोल्डन टाईम’ कोणता?
गेल्या काही दिवसांपासून सोने या मौल्यवान धातूचा भाव सातत्याने वाढत आहे. सध्या सोन चक्क एका लाखाच्या वर जाऊन पोहोचलं आहे.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने या मौल्यवान धातूचा भाव सातत्याने वाढत आहे. सध्या सोन चक्क एका लाखाच्या वर जाऊन पोहोचलं आहे. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि अमेरिकेने घेतलेले काही निर्णय यामुळे भारतात सोन्याला चांगलाच भाव आला आहे. दरम्यान, आता सोनं चक्क दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अंदाज जर खरा असेल तर सोन्यात आता गुंतवणूक करावी का? की भाव कमी होण्याची वाट पाहावी? असे विचारले जात आहे.
सोनं तब्बल दीड लाखांपर्यंत जाणार?
तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव भविष्यात 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. वैश्विक पातळीवरील अनिश्चितता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जागतिक बाजाराची स्थिती लक्षात घेता तसा अंदाज व्यक्त केला जातोय. सोन्याचा भाव सातत्याने वाढत असल्यामुळे गेल्या काही काळात सोनं हा गुंतवणुकीचा आवडीचा पर्याय म्हणून समोर येत आहे. आगामी काळात हेच सोने प्रति 10 ग्रॅमचा भाव 1.4 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसमधील कमोडिटीज आणि करन्सी हेड किशोर नारने यांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे.
सोन्याच्या दरात जेव्हा घसरण होईल, तेव्हाच…
सोन्याचा भाव 1.5 लाखांपर्यंत कधी जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र हा भाव भविष्यात 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकतो. सोन्याच्या दरात जेव्हा घसरण होईल, तेव्हाच त्यात गुंतवणूक करा. आगामी दशकभरासाठी सोनं हा गुंतवणुकीचा एक प्रभावी मार्ग असणार आहे. सोन्यापेक्षा गुंतवणुकीचा दुसरा मार्ग असेल तरच लोकांनी अन्य पर्यायाच विचार करावी, असा सल्ला किशोर नारने यांनी दिला आहे.
मंगळवारी सोन्याचा ऐतिहासिक भाव
मंगळवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. जागतिक व्यापारातील तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेला आयात कर यामुळे सोन्याचा हा भाव वाढला होता. मार्च 2024 पासून सोन्याच्या भावात तब्बल 59 टक्क्यांची तेजी पाहायला मिळालेली आहे.