Gold Rate big fall : का कमी झाली सोन्याची झळाळी? एकाच आठवड्यात सोने झर झर कमी, काय आहेत कारणं?
Gold Rate News : सोन्याचे भाव एकाच आठवड्यात झर झर कमी झाल्याने याची बाजारात चर्चा आहे. सोन्याचे भाव गडगडण्यामागची कारणे काय असतील?
जर तुम्ही अशात सोने खरेदीचा विचार करत असाल तर त्यासाठी अनुकूल काळ आहे, कारण गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमती(Gold Price) झर झर उतरल्या आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी हा चांगला मुहूर्त म्हणावा लागेल. गेल्या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या किंमतीत खूप उतार चढाव दिसून आला. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या भावात 2.20 टक्क्यांची घसरण झाली आणि भाव 50, 810 रुपयांवर स्थिरावले. सध्या डॉलर इंडेक्स (Dollar Index) तेजीत आहे. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने (Federal Reserve) व्याजदर वाढीचा रोख कायम ठेवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजात सोन्याचे भाव गेल्या 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर (Lowest Level) पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1,742 डॉलर प्रती औसवर बंद झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात या किंमती 1,780 डॉलरवर बंद झाल्या होत्या.
घसरणी मागचं कारण का?
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती 1,780 डॉलरवर बंद झाल्या होत्या. यामागचे मुख्य कारण डॉलर इंडेक्समधील घडामोडी आहेत. डॉलर इंडेक्सने रॉकेटसारखी भरारी घेतली आहे. व्याजदर वाढल्याने अमेरिकन रिझर्व्ह बँकेने कठोर धोरणांचा अंगिकार केला आहे. डॉलर इंडेक्सने 105.80 स्तर पार केला असून गेल्या 20 वर्षांतील सर्वात उच्चांकी 107.78 पातळी गाठली आहे. परिणामी सोन्याच्या किंमती 1710 ते 1780 डॉलर प्रति औसच्या दरम्यान राहिल्या. एमसीएक्स सोन्याच्या किंमती 50,400 रुपयांहून 52,000 प्रति 10 ग्रॅम स्तरावर सध्या व्यापार करत आहेत.
तज्ज्ञांचे मत काय?
सोन्याच्या भावातील ही घसरण कुतुहलाचा विषय झाली आहे. एकीकडे सोन्याच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना गुंतवणूकीची आयती संधी उपलब्ध झाली आहे. तर दुसरीकडे तज्ज्ञ या घसरणीची कारणे शोधत आहेत. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडमधील कमोडिटी आणि करन्सी रिसर्च च्या उपाध्यक्ष सुगंधा सचदेव यांच्या मते गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरला पसंती दिल्याने ही घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर सोन्याच्या किंमती पोहचल्या आहेत. त्यामुळेच बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.
दोन हजारांनी भावात घसरण
भारतात सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात तब्बल दोन हजारांची घसरण पहायला मिळाली. सराफांनी घरगुती बाजारात सोने 28 डॉलर प्रति औसपर्यंत सवलतीत विक्री केले. रॉयटर्स या आघाडीच्या वृत्तसंस्थेने सोन्याच्या किंमतीत 40 डॉलरची सवलत मिळाल्याचे सांगितले. भारतातील सोन्याच्या किंमतीत 3 टक्के वस्तू आणि सेवा कर(GST) आणि 15 टक्के आयात शुल्क (Import Duty) यांचा ही समावेश होतो. परिणामी भारतात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅमसाठी 52,300 रुपये मोजावे लागत होते. आता शुक्रवारी हा भाव 50,650 रुपयांच्या घरात आला होता.