Gold Silver Rate Today : सोन्यात उसळी, चांदी घसरली, जाणून घ्या ताजा भाव
Gold Silver Rate Today : सोन्याने दसऱ्याचा मुहूर्त अखेर गाठलाच. विजया दशमीला सोन्याने दरवाढीचे सीमोल्लंघन केले. चांदीत घसरण दिसून आली. सोने-चांदीने गेल्या पंधरवाड्यात मोठी उसळी घेतली आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीत तेजी दिसून आली. मात्र अमेरिकन बाजारात डॉलरचे मौल्यवान धातूंना आव्हान कायम आहे.
नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : विजयादशमीला सोन्याने दरवाढीचे सीमोल्लंघन केले. तर चांदीला मात्र हा मूहूर्त काही गाठता आला नाही. चांदीत घसरण दिसून आली. इस्त्राईल-हमास युद्धानंतर सोने-चांदीला झळाळी आली. त्यापूर्वी घसरणीच्या निच्चांकाकडे किंमती सरकल्या होत्या. या युद्धाने किंमतींना बळ दिले. भारतात आता सणांची रेलचेल सुरु झाली आहे. दसऱ्यानंतर बाजारपेठेला दिवाळीचे वेध लागले आहे. दिवाळीत देशात सर्वाधिक उलाढाल होते. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या मागणीत वाढ होणार आहे. खरेदीचा हा हंगाम आहे. या काळात सर्वाधिक खरेदी करण्यात येते. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर (Gold Silver Price Today 25 October 2023) दिसून येईल.
या महिन्यात सोन्याची मुसंडी
या महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,750 रुपये होता. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,530 रुपये होती. तर 24 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,700 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,840 रुपये आहे. या काळात सोन्यात जवळपास तीन हजारांपेक्षा अधिकची वाढ दिसून आली. 3 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदी 71,000 रुपये होती. तर 24 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये होता.
सोन्यात किरकोळ वाढ
गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्यात सोन्यात 1800 रुपयांनी भावात वाढ झाली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 240 रुपयांची वाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,840 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चांदीत घसरण
गेल्या आठवड्यात सुरुवातीला घसरणीचे सत्र होते. त्यानंतर बुधवारी 18 ऑक्टोबरला एक हजारांनी भाव वधारला. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 21 ऑक्टोबर रोजी 1200 रुपयांनी दर वधारले. या आठवड्यात 23 ऑक्टोबर रोजी किंमतीत 200 रुपयांची घसरण आली. 24 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),काल 24 कॅरेट सोने 60,698 रुपये होते. 23 कॅरेट 60,455 रुपये, 22 कॅरेट सोने 55,600 रुपये, 18 कॅरेट 45,524 रुपये, 14 कॅरेट सोने 35,508 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72094 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.