Gold Silver Rate Today : अमेरिकन डॉलरची गुगली! घसरल्या सोने-चांदीच्या किंमती
Gold Silver Rate Today : सोन्याने म्हणता म्हणता पुन्हा 60 हजारांचा पल्ला गाठला. गेल्या दोन महिन्यातील कसर अजून सोन्याने भरुन काढली नाही. येत्या दिवसांत दरवाढ होण्याची कितीपत शक्यता आहे.
नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : सोने आणि चांदीने जुलै महिन्यात करिष्मा दाखवला. गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही धातूंनी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58,000 रुपयांवर उतरला होता. तर चांदी पण 70 हजार ते 72,000 रुपये किलोच्या दरम्यान होती. पण जुलैमध्ये सोने-चांदीने कमबॅक केले. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. सोन्याने म्हणता म्हणता पुन्हा 60 हजारांचा पल्ला गाठला. गेल्या दोन महिन्यातील कसर अजून सोन्याने भरुन काढली नाही. अमेरिकेतील घडामोडींवर सोने-चांदीची आगेकूच ठरेल. चीनच्या खेळीने तांब्याची मात्र चांदी होत आहे. जागतिक बाजारात तांब्याचे भाव वधारले आहेत. येत्या दिवसांत सोने-चांदीची दरवाढ (Gold Silver Price Today) होण्याची कितीपत शक्यता आहे?
जागतिक बाजारातील घडामोड
जागतिक बाजारात सोने वधारले. सोने 1,985 डॉलरवर पोहचले. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याने उसळी घेतली होती. पण अमेरिकन डॉलरने खेळी खेळल्याने सोन्याचे पानिपत झाले. डॉलर 15 आठवड्यांच्या निच्चांकानंतर पहिल्यांदाच उसळला. गोल्ड फ्युचर मार्केटमध्ये ऑगस्ट 2023 साठी प्रति 10 ग्रॅम 254 रुपये निच्चांकी सौदा ठरला आहे. तर चांदी किलोमागे 483 रुपयांनी घसरुन 74,966 रुपयांवर येऊन ठेपली आहे.
अमेरिकन केंद्रीय बँकेकडे लक्ष
महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचा धडका लावला होता. पण यावेळी फेड व्याजदरात वाढ करणार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्याचा सोन्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन उच्चांक करण्यास दोन्ही धातूंना बळ मिळणार नाही. पण जर व्याजदर वाढले तर सोने-चांदी चमकेल.
या महिन्यात असा वाढला भाव
सोने आणि चांदीची आगेकूच सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता पर्यंत सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली. दोन्ही धातूंनी मुसंडी मारली. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. अजून दोन्ही धातूंना किंमतीत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.
आठवड्यातील चढउतार
- आठवड्याच्या पहिल्या दिवशी 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या होत्या.
- 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते.
- 18 जुलै रोजी मोठी उलाढाल झाली नाही.
- तर 19 जुलै रोजी भावाने मोठी आघाडी घेतली. सोन्याने 670 रुपयांची उसळी घेतली.
- 20 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली.
- 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली.
- 22 कॅरेट सोने 55,550 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,590 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरले.
- गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,455 रुपये, 23 कॅरेट 59,217 रुपये, 22 कॅरेट सोने 54,460 रुपये, 18 कॅरेट 44,591 रुपये, 14 कॅरेट सोने 34,781 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,622 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.