हॉटेल व्यवसायाला अच्छे दिन, कोरोना निर्बंध हटवल्यानंतर ग्राहकांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली
कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर हॉटेल व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. हॉटेलमधील ग्राहकांची संख्या कोरोनापूर्व पातळीवर पोहोचल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे.
मुंबई : गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा पर्यटनाला बसला. कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public transport system) बंद होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोकांना घराच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे पर्यटन ठप्प झाले. पर्यटन ठप्प झाल्याने त्याचा परिणाम हा हॉटेल इंडस्ट्रीवर मोठ्या प्रमाणात झाला. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. या काळात हॉटेल व्यवसायिकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर हॉटेल व्यवसायाला अच्छे दिन येताना दिसत आहेत. कोरोना काळाच्या तुलनेत आता हॉटेल व्यवसाय जवळपास साठ टक्क्यांनी वाढला आहे. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्याचसोबत उन्हाळ्याच्या सुट्यांना देखील सुरुवात झाल्याने पर्यटन वाढून हॉटेल व्यवसाय आणखी वाढू शकतो, असा अंदाज हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
मार्चमध्ये ग्राहकांची संख्या 61 टक्के
एचव्हीएस एनरॉकच्या एका रिपोर्टनुसार देशात काही महिन्यापूर्वी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला होता. त्या काळात हॉटेमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत जवळपास चाळीस टक्क्यांची घट झाली होती. मात्र आता हळूहळू स्थिती बदलत असून, ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांची संख्या 40 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचली. तर मार्चमध्ये ग्राहकांच्या संख्येत 61 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. हॉलेल व्यवसाय हा कोरोना पूर्व काळाच्या पातळीवर पोहोचला असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पुढील एक दोन महिन्यांमध्ये हॉटेल व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता आहे.
व्यवसाय वाढला मात्र उत्पन्नात घट
याबाबत प्रतिक्रिया देताना एका हॉटेल व्यवसायिकाने म्हटले आहे की, सध्या हॉटेल व्यवसाय हा कोरोना पूर्व पातळीवर पोहोचला आहे. मात्र असे जरी असले तरी देखील नफ्यात मात्र मोठी घट झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत असलेली महागाई आहे. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अन्न-धान्य व भाजीपाल्यांच्या किमती देखील महाग झाल्या आहेत. कमगारांची मजुरी देखील वाढली आहे. महागाई ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात मात्र अद्यापही हॉटेलिंगचे दर वाढले नाहीत. त्यामुळे नफ्यातील मार्जीन कमी झाले आहे.