देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकिटांच्या किमतीवरील मर्यादेला 3 महिन्यांची मुदतवाढ
नागरी उड्डाण मंत्रालयानं घरगुती विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर जैसे थे ठेवून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्लीः नागरी उड्डाण मंत्रालयानं घरगुती विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर जैसे थे ठेवून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 24 नोव्हेंबरनंतरही देशांतर्गत उड्डाणांच्या वरच्या आणि खालच्या टप्प्यातील विमान प्रवासाच्या तिकिटाची मर्यादा तीन महिन्यांपर्यंत कायम राहणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी (29 ऑक्टोबर) ही माहिती दिली (Hardeep Singh Puri declared fare limits to remain in place for another three months amid Corona).
नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रथम 21 मे ते 24 ऑगस्टदरम्यान सात टप्प्यांद्वारे हवाई प्रवासाच्या तिकिटांचे दर निश्चित केले आहेत. यात तिकिटांचे दर जवळचा प्रवास आणि लांबच्या प्रवासाच्या वर्गवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. प्रवासाला लागणारा कालावधी म्हणजेच वेळेनुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आले होते. नंतर तो नियम 24 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता. आता केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयानं त्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, “देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या या वर्षाच्या अखेरपर्यंत कोव्हिड 19 संसर्गाआधीच्या स्थितीपर्यंत वाढली, तर या तिकिटांवरील किमतीतील या सवलती रद्द करण्यात येतील. आम्ही तिकिटांवरील ही मर्यादा आणखी तीन महिन्यांसाठी वाढवत आहोत. असं असलं तरी यादरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा झाली आणि उड्डयन मंत्रालयाकडून या उपाययोजनांची गरज नसल्याचं सांगण्यात आलं तर ही सवलत कोणत्याही वेळी रद्द केली जाईल.”
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासावर जवळपास 2 महिने पूर्णपणे बंदी होती. यानंतर 25 मे रोजी काही निर्बंधांसह विमानसेवा पुन्हा सुरु झाली.
तिकिट दरांच्या नियमांनुसार कोणत्या तिकिटांची किंमत किती?
दरम्यान, केंद्रीय उड्डयन मंत्रालयाच्या या सवलतीनुसार 40 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी तिकिट किमतींवर 2 हजार ते 6 हजारांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. 40 ते 60 मिनिटांच्या विमान प्रवासाच्या तिकिटांना अडीच ते साडेसात हजार, 60 ते 90 मिनिटांच्या प्रवासासाठी 3 हजार ते 9 हजार रुपये, 90-120 मिनिटांसाठी साडेतीन ते 10 हजार रुपये, 120-150 मिनिटांसाठी साडेचार ते 13 हजार रुपये, 150 ते 180 मिनिटांसाठी साडेपाच हजार ते 15 हजार 700 रुपये आणि 180-210 मिनिटांच्या विमान प्रवासाच्या तिकिट दरांवर साडेसहा ते 18 हजार 600 रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
कोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगिती कायम, मुंबई मेट्रोही बंदच
तीन महिन्यांनी आईच्या भेटीस आतुर, पाच वर्षांच्या चिमुरड्याचा एकट्याने विमान प्रवास
Hardeep Singh Puri declared fare limits to remain in place for another three months amid Corona