तुम्ही कार बनवू शकत नाही म्हणणाऱ्या कंपनीला रतन टाटांनी कशी खरेदी केली
रतन टाटा यांनी जग्वार लँड रोव्हर कशी खरेदी केली हे फार कमी लोकांना माहित असेल. टाटा मोटर्सने 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर खरेदी केले. पण या ब्रिटीश कंपनीची कमान रतन टाटांच्या हाती कशी आली आणि हा सौदा कितीला झाला, जाणून घेऊयात.
रतन टाटा हे जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठीत उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटा यांचा मोठा चाहता वर्ग आहे. देश-विदेशातील लोकांना देखील त्यांच्याबाबत विशेष जिव्हाळा आहे. कारण रतन टाटा संकटाच्या वेळी देशासाठी उभे असतात. देशात आतापर्यंत आलेल्या अनेक संकटात रतन टाटा यांनी भरपूर मदत केली आहे. जेव्हा जेव्हा देशाला गरज असते तेव्हा ते मदतीचा हात पुढे करतात. आज आपण रतन टाटा यांच्या त्या डीलबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे टाटा मोटर्सला लक्झरी जग्वार लँड रोव्हरची कमान मिळाली. रतन टाटा यांना गाड्या बनवता येणार नाही असे म्हटले जात असताना त्यांनी ही इतकी मोठी टाटा मोटर्स कंपनी उभी करुन दाखवली.
जग्वार लँड रोव्हरची कहाणी काय?
1989 मध्ये, फोर्डने ब्रिटीश लेलँडकडून जग्वार ही कंपनी $2.5 बिलियनला विकत घेतली होती. ही कार अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये यायची. जी बेंटले आणि रोल्स रॉयसची स्पर्धक मानली जात होती. आजची जग्वार लक्झरी कार ब्रँडमधील मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि व्होल्वो यांसारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
फोर्डने जागतिक बाजारपेठ काबीज केली
फोर्डने केवळ 90 च्या दशकात जग्वार खरेदी केली आणि ऑस्टिन मार्टिन आणि व्होल्वो सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सशी करार केला. फोर्डने हे तीन सेगमेंट अंदाजे 6.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. 2000 मध्ये, फोर्डने लँड रोव्हर 2.7 अब्ज डॉलर्सला विकत घेतले. तो काळ फोर्डचा होता असे म्हणायला हरकत नाही.
फोर्डने यशाच्या शिखरावर पोहोचली पण नंतर लवकरच तिला वाईट दिवस ही पाहावे लागले. 2006 मध्ये, युनायटेड स्टेट्स ऑटो मार्केटमध्ये सुमारे 12.7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याने फोर्डने 2007 मध्ये आपले सात प्लांट बंद केले. त्यानंतर मार्च 2007 मध्ये फोर्डने ऑस्टिन मार्टिनला विकले. जूनमध्ये, फोर्डने जग्वार लँड रोव्हर विकण्यासाठी जगभरात लिलाव करण्याची घोषणा केली. टाटांनी हा लिलाव जिंकून फोर्डला दिवाळखोरीतून वाचवले.
टाटाने 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर 2.3 अब्ज डॉलर्सला विकत घेतले. तर फोर्डने या दोन कंपन्यांना खरेदी करण्यासाठी 5.2 अब्ज डॉलर्स खर्च केले होते. पण रतन टाटा यांनी या कंपन्या अशा वेळी विकत घेतल्या, जेव्हा या कंपन्या अत्यंत वाईट काळातून जात होत्या. 1998 मध्ये ज्या कंपनीने टाटा समूहाला सांगितले होते की ते कार बनवू शकत नाही त्याच फोर्ड कंपनीला संकट काळात टाटांनी वाचवले होते.