Home Loan | कमाईवर नको गृहकर्जाचा भार, योग्य EMI निवडल्यास आर्थिक ओढाताण टळणार
घराचं स्वप्न पूर्ण करताना गृहकर्जाच्या बोजाखाली तुम्ही दबून जाऊ नये यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कमाई आणि कर्जाचे हफ्ते हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. खर्चाचे आणि कर्जाचे नियोजन करण्यासाठी ईएमआयची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडणे आवश्यक आहे.
मुंबई : लग्न पहावं करावं घर पहावं बांधून अशी आपल्याकडे म्हण आहे. आयुष्यातील या दोन्ही प्रसंगी कमाई आणि खर्चाचे गणित जुळविणे अत्यावश्यक असते. नाहीतर पुढे अपेक्षांचे ओझे वाहता वाहता पुरेवाट लागते. तेव्हा गृहकर्ज घेताना कमाई आणि खर्च याचं भान ठेवणं आवश्यक आहे. घराचं स्वप्न पूर्ण करताना गरजांचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही गृहकर्जाचा कालावधी आणि हफ्ता निवडायला हवा. गृहकर्जाचे हफ्ते पुढील 15 ते 20 वर्षांसाठी असतात. त्यामुळे कर्ज घेण्यापुर्वी तुमची आवक आणि खर्च तसेच भविष्यातील वाढीव खर्च यांचा अंदाज बांधत ईएमआय आणि त्याचा कालावधी निवडणे सोयीचे ठरेल. तरच पुढील 15 ते 20 वर्षे हफ्त्याचा ताण जाणवणार नाही. त्यासाठी पुढील काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
सध्याची मिळकत किती
सध्या घरात किती आवक आहे, अर्थात महिन्याकाठी घरामध्ये किती रुपये येतात याची खातरजमा करणे आवश्यक आहे. जसे की, नोकरी, इतर माध्यमातून किती मिळकत हातात येते याचा संपूर्ण हिशेब करणे गरजेचे आहे. तसेच भविष्यातील गुंतवणुकीतून काही रक्कम हातात येणार असेल तर त्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
एकूण खर्चाचे गणित मांडा
एकूण महिन्याच्या मिळकतीतून दैनंदिन खर्चासह मुलांचे शिक्षण, वडीलधा-यांच्या औषधांचा खर्च, आकस्मीत खर्च, प्रवास, नातेवाईक, सण समारंभ, पर्यंटन या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. एवढ्यावरच न थांबता भविष्यातील एखाद्या मोठ्या खर्चासाठी निधीची गरज असते. त्याचाही भाग तुम्हाला काढून ठेवावा लागेल. हा सर्व खर्च वजा जाता, हातात किती मिळकत उरते, त्याधारे तुम्हाला ईएमआय ठरवावा लागेल.
या उपायांनी मिळेल गृहशांती
- सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा ईएमआय हा 40 टक्क्यांपेक्षा अधिक असायला नको.
- कारण त्यापेक्षा जास्तीचा ईएमआय हा तुमच्या रोजच्या खर्चावर परिणाम करेल
- ईएमआयच्या बोजा खाली रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवता यावा
- जमा-खर्चाचा हिशेब मांडून गृहकर्जाचा योग्य कालावधी आणि योग्य हफ्ता निवडा
- ईएमआयचा हफ्त्यासोबत अतिरिक्त रक्कम हफ्त्याच्या रक्कमेत जमा करा
- त्यामुळे तुमची मुळ कर्ज रक्कम कमी होईल, परिणामी हफ्त्याची रक्कम कमी होईल
- ईएमआयचा हफ्ता थकवू नका. शक्यतोवर कर्ज कालावधीपूर्वीच गृहकर्ज परतफेड करा
संबंधित बातम्या :
आताच्या काळात रुपयात काय भेटतं हो? काय सांगता, दोन लाखांचा सरकारी विमा भेटतो की, कसा?
सायबर भामट्यांना चकवा, क्रेडिट-डेबिट कार्डासाठी नियमात बदल, नवीन वर्षात नवी पेमेंट पद्धत