मुकेश अंबानी एकदम आघाडीवर, तर गौतम अदानी झाले आऊट, ही यादी आहे तरी कोणती?
Hurun India : फोर्ब्स ते ब्लूमबर्गपर्यंत देशात मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी हे दुसरे सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. पण नुकतीच एक अशी यादी आली आहे की, त्यात अदानी यांचे नावच गायब आहे. तर अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
जेव्हा पण देशातील श्रीमंत उद्योजकांचे नाव समोर येते, तेव्हा मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी यांचे नाव हमखास निघते. फोर्ब्स असो की ब्लूमबर्ग, देशातच नाही तर आशियात मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. पण नुकतीच एक अशी यादी समोर आली आहे की, त्यात मुकेश अंबानी हे तर आघाडीवर आहेत. पण गौतम अदानी हे यादीतून आऊट झाले आहेत. त्यांचे नावच या यादीत सामाविष्ट नाही. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की ही यादी आहे तरी कोणती?
अंबानी क्रमांक 1, बजाज क्रमांक 2 वर
बार्कलेज प्रायव्हेट क्लाईंट्स हुरुन इंडियाची सर्वात मौल्यवान व्यावसायिक कुटुंबांची एक यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंब 25.75 लाख कोटी रुपयांसह देशातील सर्वात मौल्यवान उद्योगिक कुटुंब ठरले आहे. पण या यादीत अदानी कुटुंब दुसरे नाही. अदानी यांचा या यादीत समावेशच केलेला नाही. तर त्यांच्याऐवजी या यादीत बजाज कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार, बजाज कुटुंब 7.13 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय या यादीत बिर्ला कुटुंबिय 5.39 लाख कोटी रुपयांसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अदानी या यादीत
अदानी कुटुंबाचे व्यावसायिक मूल्य 15.44 लाख कोटी रुपये आहे. पण त्यांना मुख्य यादीत स्थान देण्यात आले नाही. या वृत्तानुसार, दुसरी पिढी व्यवासायिक नेतृत्व करत असलेल्या यादीत अदानी कुटुंबाला आघाडीवर ठेवण्यात आले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटच्या पुनावाला कुटुंबाला 2.37 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांवर दुसऱ्या स्थानी घेण्यात आले आहे.
सातत्याने संपत्तीत वाढ
हुरून इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनेद यांनी या यादीची माहिती दिली. त्यांच्या मते गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन चतुर्थांश कुटुंबाच्या व्यावसायिक मूल्यात वाढ दिसून आली. भारतात दीर्घकाळ आर्थिक स्थिरता आणि वृद्धीसाठी या कुटुंबियांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. जागतिक पातळीवर भारताविषयी चांगली भावना आहे. भारतात परदेशी गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. त्याचा फायदा देशातील टॉप बिझनेसला होत आहे.