भारतात एप्रिलमध्ये रोजगाराच्या तब्बल 88 लाख नव्या संधी! पण मागणीच्या तुलनेत संधी कमीच
उद्योगात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. तर सेवा क्षेत्रात 67 लाख नोकऱ्यांची भर पडली.
कोरोना महामारीमध्ये (Corona Pandemic) अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. पण आता कोरोना हळूहळू नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळतंय. 2022 मध्ये नोकरीच्या संधी पुन्हा निर्माण होत आहेत. रोजगाराच्या संधी (Job Opportunity) वाढत असल्याचंही 2022मध्ये पाहायला मिळालंय. देशातील तब्बल 88 लाखांनी वाढली आहे. 88 लाख लोकांना रोजगार मिळाल्याची नोंद एप्रिल महिन्यात करण्यात आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतात (India) एप्रिलमध्ये नोकरीच्या संध्या 88 लाखांनी वाढून 43.72 कोटी इतक्या नोकऱ्या दिल्या गेल्या असल्याची माहिती सीएमआयईचे सीईओ महेश व्यास यांनी म्हटलंय. मार्चअखेर देशात 42.84 कोटी जणांना नोकरी मिळाली होती. 2021-22 मध्ये देशातील श्रमशक्तीमध्ये सरासरी मासिक वाढ दोन लाख होती, असं देखील या अहवालात म्हटलंय. रोजगारापासून वंचित राहिलेल्या कामगारांना पुन्हा काम मिळाल्यानंतर ही आकडेवारी सुधारेल, असाही विश्वास व्यक्त केला जातोय.
तज्ज्ञांचं काय म्हणणंय?
हाताला काम नसणारी लोकं पुन्हा एका नोकरीकडे वळली असल्याचं निरीक्षण या अहवालातून नोंदवण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे काम नव्हतं, त्यांनी एप्रिल महिन्यात नोकरी करण्याला प्राधान्य दिलं. दरम्यान, एका महिन्यात काम करणाऱ्या वयाच्या लोकांची सरासरी वाढ दोन लाखापेक्षा जास्त असू शकत नाही. एप्रिल महिन्यात कामगार संख्या वाढण्याआधी त्यात घट नोंदवण्यात आली होती. कामगार संख्या 88 लाखांनी वाढण्याआधी त्यात 1.2 कोटी घट नोंदवण्यात आली होती. कामगारांची मागणी आणि त्यांचा पुरवठा सातत्यानं बदलत राहतो. त्यामुळे ही आकडेवारीदेखील बदलत राहते असं व्यास यांनी म्हटलंय.
मागणीच्या तुलनेत संधी कमीच…
एप्रिल महिन्यातील रोजगारात झालेली वाढ ही मुख्यतः उद्योग आणि सेवा क्षेत्रात नोंदवण्यात आली. उद्योगात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. तर सेवा क्षेत्रात 67 लाख नोकऱ्यांची भर पडली. गंभीर बाब म्हणजे या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार 52 लाखांनी कमी झाला.
मॉन्स्टर इंडियानं केलेल्या ऑनलाईन रोजगारांच्या अभ्यासातून याबाबतची मागणी किती वाढली, याचाही अभ्यास नोंदवण्यात आला. भारतात रोजगार भरतीत दरवर्षी 15 टक्के तर प्रत्येक महिन्यात चार टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोरोनानंतर आता हळूहळू अनेक गोष्टी पूर्वपदावर येत असल्यानं रोजगाराच्या संधीमध्ये वाढही होतेय. पण ज्या प्रमाणात नोकऱ्यांची मागणी आहे, त्या तुलनेत रोजगाराचं प्रमाण कमी असल्याचंही अहवालातून समोर आलंय.