एका झटक्यात 115 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त, तात्काळ दरवाढ कमी; कुणाला मिळाला दिलासा?
राजधानी दिल्लीत सध्या घरगुती वापराचा गॅस 1053 रुपये प्रति युनिटने मिळतो. तर कोलकात, मुंबई, चेन्नईत अनुक्रमे 1,079 रुपये, 1,052.5 रुपये आणि 1,068.5 रुपयांनी विकला जातो.
नवी दिल्ली: देशवासियांसाठी दिवाळीनंतरची (diwali) पहिली आनंदाची बातमी आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मोठी कपात केली आहे. ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने गॅस सिलिंडर दरात 115.50 रुपयांची घट करण्यात आली आहे. जून महिन्यानंतर सिलिंडर दरात कपात (Lpg Price Today) करण्याची ही सातवी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर घसरल्याने देशांतर्गतही एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 610 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह आदींना मोठा दिलासा मिळाला आहे.
कमर्शियल वापराच्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचे भाव आता 1744 रुपये झाले आहेत. यापूर्वी हे सिलिंडर दिल्लीत 1859 रुपयांना मिळत होते. कोलकातामध्ये 19 किलोवाला हा सिलिंडर आता 1846 रुपयांना मिळणार आहे. याची किंमत आधी 1959 रुपये होती.
तर मुंबईत या 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 1,811.50 रुपयांऐवजी आता 1,696 रुपये असणार आहे. तर चेन्नईत या सिलिंडरची किंमत 2,009.50 रुपयांऐवजी 1,893 रुपये असणार आहे. आजपासूनच ही दर कपात लागू करण्यात आली आहे.
1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. वाजवीपेक्षा या गॅस सिलिंडरची किंमत अधित होती. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात कमी आली होती. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती जैसे थेच राहणार आहेत. 6 जुलै रोजी 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये प्रति युनिटने वाढ करण्यात आली होती. यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 19 मे 2022 रोजी बदल करण्यात आले होते.
राजधानी दिल्लीत सध्या घरगुती वापराचा गॅस 1053 रुपये प्रति युनिटने मिळतो. तर कोलकात, मुंबई, चेन्नईत अनुक्रमे 1,079 रुपये, 1,052.5 रुपये आणि 1,068.5 रुपयांनी विकला जातो. स्थानिक पातळीवरील व्हॅटचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात.