पुन्हा भारतीय व्यक्ती परदेशी कंपनीच्या सर्वौच्च पदी, टेस्लाच्या सीएफओपदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती
इलेक्ट्रीक कंपनी टेस्ला हीच्या चिफ फायनान्सियल ऑफीसर पदी नियुक्ती होण्यापूर्वी वैभव तनेजा याच कंपनीत चिफ अकाऊंटींग ऑफीसर म्हणून कार्यरत होते.
नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला हीच्या चिफ फायनान्सियल ऑफीसर पदावर भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रीक कंपनी टेस्ला ही भारतात प्रोडक्शन सुरु करणार असून पुण्यात तिने आपले कार्यालय देखील थाटले आहे. या पार्श्वभूमीवर एका भारतीय वंशाच्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इलेक्ट्रीक कंपनी टेस्ला हीच्या चिफ फायनान्सियल ऑफीसर पदी नियुक्ती होण्यापूर्वी वैभव तनेजा याच कंपनीत चिफ अकाऊंटींग ऑफीसर म्हणून कार्यरत होते. त्यांना आता चिफ फायनान्सियल ऑफीसर म्हणून बढती देण्यात आली आहे. याआधी चिफ फायनान्सियल ऑफीसर पदावर जॅचरी किर्खान हे काम पाहत होते. त्यांनी टेस्ला इलेक्ट्रीक कार आणि सोलार पॅनल मेकर कंपनीच्या वित्तीय प्रमुख पदावर चार वर्षे तर कंपनीत सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी ते या पदावरुन पायउतार झाले. नवीन बदल झाल्यानंतर टेस्लाच्या शेअरमध्ये शेअरबाजाराचे व्यवहार संपण्यापूर्वी एक टक्क्यांनी घसरण झाली. या कंपनीचा एक भाग बनणे हा आपल्यासाठी एक चांगला अविस्मरणीय अनुभव आहे आणि मी 13 वर्षांपूर्वी सामील झालो तेव्हापासून आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे,” किर्खान यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिल्ली विद्यापीठाचे कॉमर्स ग्रॅज्यूएट
दिल्ली विद्यापीठाचे कॉमर्स ग्रॅज्यूएट असलेल्या 45 वर्षीय वैभव तनेजा यांनी टेस्ला कंपनीने सोलार सिटीचे साल 2016 रोजी संपादन केल्यावर ही कंपनी जॉईंट केली होती ते सध्या चिफ अकाऊंटींग ऑफीसर म्हणून काम पाहात होते. साल 2021 मध्ये वैभव तनेजा यांची टेस्लाची इंडीयन शाखा टेस्ला इंडीया मोटर्स एण्ड एनर्जी प्रायवेट लिमिटेडचे संचालक म्हणून निवड झाली होती. तनेजा यांना अकाऊंटींगचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी अनेक टेक्नॉलॉजी, फायनान्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्यात काम केले आहे.
भारतीय बाजारात उतरण्याची तयारी
टेस्ला कंपनीने भारतीय बाजारात आपल्या कंपन्या उतरण्याची तयारी जोमाने केली असताना तनेजा यांना हे महत्वाचे पद सोपविले आहे. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांनी टेस्लाच्या योजनांबद्दल चिंता व्यक्त केली होती तेव्हा सीएफओ जॅचरी किखॉर्न यांना इलॉन मस्क यांचे उत्तराधिकारी मानले जात होते, सध्या इलॉन मस्क टेस्ला, स्पेसएक्स, न्युरॉलिंक, दि बोरींग आदी कंपन्यांचे प्रमुख तर एक्स ( पूर्वाश्रमीची ट्वीटर ) कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफीसर आहेत.