Indian Rupee: RBIचे यत्न, प्रयत्न चालेना; रुपयाची विक्रमी घसरगुंडी थांबेना
गेल्या आठवड्यात रुपयाची विक्रमी घसरगुंडी उडाली आहे. रुपया आतापर्यंतच्या 2 पट निच्चांकी (Rupee All Time Low) पातळीवर आहे. इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रुपया 56 पैशांनी घसरला होता आणि 77.46 प्रति डॉलरवर बंद झाला होता.
भारतीय चलन ‘रुपया’साठी (INR) हा सर्वात वाईट काळ आहे. गेल्या काही दिवसांत रुपयाचे मूल्य (Indian Rupee Value) झपाट्याने घसरले असून,रुपया एकापाठोपाठ एक नव्या नीचांकी पातळीवर पोहोचत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात 2.50 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यानंतरही मंगळवारी रुपयाने घसरगुडीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारच्या बाजारातील उलाढालीत डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर घरंगळले. रुपयाची स्थिती आजकाल इतकी खालावली आहे की, रिझर्व्ह बँकेचे (RBI) प्रयत्नही अपुरे ठरत आहेत. देशांतर्गत चलनाचे मूल्य वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या साठ्यातील डॉलर बाजारात ओतून ही रुपया सारण्याचे नाव घेईल तर शप्पथ, रुपयाचं अवमूल्यन काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांनंतरही रुपया नाही सावरला
इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंजच्या(Interbank Forex Exchange) व्यापारात डॉलरच्या (USD) तुलनेत रुपया सुरुवातीला घसरून 77.67 वर खुला झाला. दिवसभराच्या व्यवहारात तो एकवेळ घसरून 77.80 प्रति डॉलरच्या पातळीवर आला.रुपयाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरगुंडी आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेने स्पॉट मार्केट (Spot Market)आणि वायदे बाजार (Future Market) या दोन्हींमध्ये हस्तक्षेप केला, त्यामुळे रुपयाला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, यानंतरही मंगळवारच्या व्यापारात तो 25 पैशांनी घसरून 77.56 वर बंद झाला. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 77.31 वर राहिला होता.
घसरण्याचा नवा विक्रम
गेल्या आठवड्यात रुपयाची विक्रमी घसरगुंडी उडाली आहे. रुपया आतापर्यंतच्या 2 पट निच्चांकी (Rupee All Time Low) पातळीवर आहे. इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रुपया 56 पैशांनी घसरला होता आणि 77.46 प्रति डॉलरवर बंद झाला होता.भारतीय चलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात खालची पातळी (INR All Time Low) होती. त्या दिवशी रुपयाने मार्चमध्ये प्रति डॉलर 76.98 पर्यंत घसरण्याचा विक्रम मोडला होता. यानंतर गेल्या आठवड्यात गुरुवारी रुपया 77.50 वर बंद झाला होता. आता भारतीय चलनाने नवीन नीचांकी पातळीचा विक्रम केला आहे.
परदेशी गुंतवणुकदारांचा विक्रीवर जोर
परदेशी गुंतवणुकदारांनी (FPI) भारतीय बाजारातून सतत विक्रीवर जोर दिला आहे. रुपयाचे मूल्य घसरण्याचे हे प्रमुख कारण आहे. एफपीआय भारतीय बाजारात निव्वळ विक्रेते ठरले आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मंगळवारी भारतीय इक्विटी बाजारातून 2,192 कोटी रुपये काढले. या महिन्यात जवळजवळ प्रत्येक सत्रात एफपीआयची विक्री करण्यात आली आहे.
वर्षभरात रुपयाची झाली इतकी घसरण
गुंतवणूक सल्लागार फर्म मिलवूड केन इंटरनॅशनलचे( Millwood Kane International)संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निश भट्ट यांनी सांगितले की, रुपया सतत नव्या निच्चांकी पातळीवर जात आहे. या प्रक्रियेत गेल्या वर्षभरात रुपयाचे मूल्य सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहे. डॉलर निर्देशांक आणि जागतिक आर्थिक वाढ यांच्या बळकटीकरणावर घोंघावणारे संकटाचे ढग रुपयाचे मूल्य वधारत आहेत. जगभरातील, विशेषत: चीनमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे डॉलर निर्देशांक मजबूत होत असून, नुकताच त्याने सुमारे दोन दशकांचा उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत आघाडीवर बाजारात होणाऱ्या विक्रीचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. अमेरिकेत व्याजदर वाढल्यानंतर त्याला आणखी वेग येईल. महागाईही वाढली आहे. ही कारणं पाहता सध्या रुपया दबावाखाली असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.