सणासुदीत विमान प्रवास महागला, देशातील मोठ्या विमान कंपनीच्या तिकीटात वाढ
देशाच्या सर्वात मोठ्या एअरलाईन्स कंपनीने ऐनसणासुदीत विमानाच्या तिकीटात 1000 रुपयांपर्यत दरवाढ जाहीर केली आहे. इंधनदर वाढ झाल्याने कंपनीने तिकीटांवर हा इंधन सरचार्ज लावला आहे.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : देशातील विमान कंपन्यांचे तिकीट दर सध्या महागडे आहेत. अशात देशातील प्रमुख एअरलाईन कंपनी इंडीगोने ( Indigo ) आपल्या तिकीटदरात वाढ केली आहे. घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीच्या तिकीटदरात इंधन सरचार्ज लावण्याची घोषणा कंपनीने केली आहे. जेट इंधनदरात झालेल्या दरवाढीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागलाय असे इंडीगो कंपनीने म्हटले आहे. इंधन सरचार्ज लावल्याने इंडीगोच्या तिकीटदरात 300 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. इंडीगोने यापूर्वी साल 2018 मध्ये इंधन सरचार्ज लावला होता. इंधनाचे दर घटल्यानंतर हळूहळू हा चार्ज हटविण्यात आला होता.
घरगुती आणि आंतराष्ट्रीय मार्गांवर वाढत्या एव्हीएशन टर्बाइन इंधनाच्या किंमतीमुळे 6 ऑक्टोबर 2023 पासून इंडीगोने तिकीटदरावर इंधन चार्ज लावण्यास सुरुवात केली आहे. देशात गेल्या तीन महिन्यांपासून एव्हीएशन टर्बाइन इंधनाच्या दरात दरवाढ होत आहे. कोणत्याही एअरलाईन कंपनीच्या परिचालनात सर्वाधिक खर्च इंधनावर होत असतो. त्यामुळे खर्च वाढल्यास एअरलाईन कंपनी इंधन चार्ज लावून खर्च भरुन काढत असते.
300 ते 1000 रुपयांपर्यंत फ्युअल चार्ज
हा इंधन चार्ज अंतरानूसार लावण्यात आला आहे. इंडीगोची फ्लाईट बुक करणाऱ्यांना प्रवासाच्या सेक्टर अंतरानूसार प्रति सेक्टर चार्ज भरावा लागेल. 500 किमी अंतर कापल्यावर 300 रुपयांचा चार्ज लागेल. तर 501 -1000 किमीसाठी तिकीटावर 400 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. 1001 ते 1500 किमी अंतरासाठी 550 रुपये फ्युअल चार्ज, 1501 ते 2500 किमीसाठी 650 रु.चार्ज अतिरिक्त द्यावा लागेल. 2501 ते 3500 किमीसाठी 800 रु. तर 3501 किमीहून अधिक अंतरासाठी इंधन चार्ज म्हणून 1000 रु.लावण्यात येणार आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात इंडीगो एअरलाईन कंपनीने ही दरवाढ केल्याने प्रवाशांचे पर्यटन महागणार आहे.