श्रीलंकेत महागाईचा आगडोंब; पेट्रोल, डिझेल 400 रुपयांच्या पार, सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ
श्रीलंकेत महागाईचा भडका उडला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून, पेट्रोल, डिझेलचे दर 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
कोलंबो : श्रीलंकेवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. महागाई (Inflation in Sri Lanka) उच्चस्थरावर पोहोचली आहे. श्रीलंकेत पेट्रोल 420 रुपये लिटर तर डिझेल 400 रुपयांवर पोहोचले आहे. या गोष्टीवरून तुम्हाला श्रीलंकेतील महागाईचा अंदाज येऊ शकतो. सरकारी तिजोरी पूर्ण रिकामी झाल्याने परदेशातून वस्तू आयात करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे तेथील सरकारने आता पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price in Sri Lanka) मोठी वाढ केली आहे. पेट्रोलचा (Petrol) भाव प्रति लिटर 24.3 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे 38.4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. नव्या दरानुसार श्रीलंकेत पेट्रोल 420 रुपये लिटर तर डिझेल 400 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. 19 एप्रिलपासून श्रीलंकन सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात दोनदा वाढ केली आहे. भारतातून श्रीलंकेला 40 हजार टन पेट्रोल, डिझेल पाठवण्यात आले आहे.
एक किलोमीटर प्रवासासाठी 90 रुपये रिक्षाभाडे
श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेल 400 रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने प्रवास भाड्यात देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढताच तेथील ऑटो यूनियनने रिक्षाच्या भाड्यात वाढ केली असून, तुम्हाला जर श्रीलंकेत एक किलोमिटरचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तब्बल 90 रुपये मोजावे लागत आहेत.
महागाई दर 40 टक्क्यांवर
श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. श्रीलंकेचा महागाई दर तब्बल 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्याची कमतरता आहे. जे अन्नधान्य उपलब्ध आहे त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचल्याने उपासमारीची वेळ आली आहे. खाद्य तेलाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. मिठापासून ते दूधापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर वाढून देखील पेट्रोल, डिझेलचा तुटवडा कायम आहे. पेट्रोल, डिझेलचा तुटवडा लक्षात घेता सरकारी कार्यलयातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताकडून मदत
भारताने श्रीलंकेला काही दिवसांपूर्वी 40 हजार टन डिझेल पाठवले होते. तर आता पुन्हा एकदा 40 हजार टन पेट्रोल पाठवण्यात आले आहे. तसेच इंधन आयातीसाठी भारताने श्रीलंकेला 50 कोटी डॉलरचे अतिरिक्त कर्ज देखील दिले होते. तसेच येत्या काळात भारत श्रीलंकेला युरीयाची देखील निर्यात करणार आहे.