Jalgaon Gold : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीत जोरदार उसळी, काय आहेत भाव तरी?
Jalgaon Sarafa Bazaar : देशभरात सोने आणि चांदीच्या दरात एकदम उसळी आली आहे. मौल्यवान धातूच्या किंमतींनी जोरदार मुसंडी मारली आहे. अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी जोरदार बॅटिंग केली.
सुवर्ण नगरी जळगाच्या सराफा बाजारात तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे.त्यामुळे शुक्रवारी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारून ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. आठवड्याच्या अखरेच्या सत्रात दोन्ही धातूंनी कमाल दाखवली. किंमती एकदम भडकल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
अशी झाली दरवाढ
मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. १४ जून रोजी चांदी ८८ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर चार दिवस पुन्हा चढ-उतार सुरू राहिला व १८ रोजी ती ८९ हजार रुपयांवर आली. १९ व २० जून रोजी प्रत्येकी एक एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९१ हजार रुपयांवर पोहोचली. शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
दुसरीकडे सोन्याचेही भाव तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारले आहेत. १९ जून रोजी ७२ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्यात २० रोजी ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ७३ हजार रुपये प्रति तोळा झाले.आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,746 रुपये, 23 कॅरेट 72,455 रुपये, 22 कॅरेट सोने 66,635 रुपये झाले. 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,666 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.