कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अचानक नोकरी गेल्यामुळे मोठी आर्थिक अडचण ओढावली होती. पण यासाठी आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, सरकारने नोकरी गमावणाऱ्यांसाठी खास योजना आणली आहे.
सरकार अटल विमा कल्याणकारी योजनेसाठी (ABKY) मोठी मोहीम सुरू करणार आहे. याबद्दल अद्याप कुठलीही ठोस प्रतिक्रिया आली नसली तरी याचं काम वेगाने सुरू आहे. सरकार या योजनेसाठी एक खास जाहिरात तयार करणार आहे, ज्याने याचा जास्तीत-जास्त लोकांना फायदा होईल.
कोरोना संकटात नोकरी गमावलेले कर्मचारी जे स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) शी जोडले आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. ते अटल विमा कल्याणकारी योजनेअंतर्गत त्यांच्या पगाराच्या 50 टक्के हक्क सांगू शकतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्हाला पुन्हा नोकरी मिळाली असेल तरीही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी ईएसआयसी आपला 44,000 कोटींचा निधी वापरणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डिसेंबरपर्यंत ईएसआयसी सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मागच्या महिन्यात, ईएसआयसीने अटल विमा उतरवलेल्या कल्याणकारी योजनेची मुदत 1 जुलै 2020 ते 30 जून 2021 पर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी आयुष्मान भारत योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयं आणि थर्ड पार्टी सर्व्हिसेस प्रोव्हायडर यांना एकत्र करण्यात आलं आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ESIC च्या अटल विमा कल्याणकारी योजनेसाठी (ABKY) नोंदणी करावी लागेल.
तुम्ही कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म भरू शकता. या अंतर्गत नोकरी गेलेल्यांना आर्थिक मदत मिळते.
ईएसआयसीच्या डेटा बेसमध्ये विमाधारकाचं आधार आणि बँक खातं जोडलेलं असलं पाहिजे. तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
नोकरी गेल्यानंतर फक्त 30 दिवसानंतर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. पूर्वी ही मुदत 90 दिवसांची होती. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांनंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.