Rice Price : घरातल्या भाताला महागाईची फोडणी, टोमॅटो, डाळीनंतर तांदळाचा नंबर
Rice Price : पाकिस्तानला नावं ठेवता ठेवता भारतातही अनेक खाद्यवस्तू, भाजीपाल्याने महागाईकडे कधी आगेकूच केली हे अनेकांना कळलेच नाही. टोमॅटो, डाळी नंतर आता तांदुळाचा नंबर लागला आहे.
नवी दिल्ली : देशातील खाद्यपदार्थांच्या, भाजीपाल्याचे भाव (Vegetables Price) वाढल्याने सर्वसामान्य नागरिक बेहाल आहेत. टोमॅटो (Tomato) , कांदा, इतर भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता क्रमांक सर्वांचा लाडक्या तांदळाचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किंमती (Rice Price Hike) गेल्या 11 वर्षांतील उच्चांकावर पोहचल्या आहेत. भारत हा सर्वात मोठा उत्पादक असताना, देशात तांदळाच्या किंमती रंग दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जेवणात तांदळाचा आधार असणाऱ्या गरिबांना मोठा फटका बसू शकतो. त्यांचे खाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना मान्सूनचे पण गालबोट लागले आहे. हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.
अल-नीनो मुळे गणित बिघडले अलनीनोमुळे सध्या भारतीय पिकांचं आणि उत्पादनाचं गणित बिघडलं आहे. त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. भारत जगातील मोठा तांदुळ निर्यातक आहे.
गरिबांवर संकट तांदळाच्या किंमती वाढणे ही काही सामान्य बाब नाही. आफ्रिकन राष्ट्रात तांदळाचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश होतो. देशातील एक वेळच्या भोजनाला महाग जनतेला तांदळाचा आधार आहे. स्वस्तात पोट भरण्याचे खाद्य म्हणून त्याकडे पाहिले जाते. तांदळाच्या किंमती वाढणे म्हणजे, त्यांच्या ताटातील उरलासुरला भात ही गायब करण्यासारखे आहे.
भारत करतो तांदळाची निर्यात भारत जगाला तांदळाचा पुरवठा करतो. जगातील तांदळात भारताचा वाटा 40 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावर्षी 2022 मध्ये भारताने 5.6 कोटी टन तांदळाची निर्यात केली होती. परंतु यावर्षी तांदळाचा पुरवठा कमी असल्याने भाव वाढले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
3 अब्ज लोकांचे खाद्य जगभरातील 3 अब्ज लोकांचे तांदुळ हे मुख्य जेवण आहे. तांदळाचे 90 टक्क्यांहून अधिक उत्पादन एकट्या आशियात होते. तांदळाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. अलनीनोमुले यावर्षी आशिया आणि आफ्रिका खंडात हवामानाची स्थिती चिंताजनक आहे.
भाव 11 वर्षांच्या उच्चांकावर हंगामात पाऊस न पडणे, उन्हाळ्यात बेमौसमी पाऊस पडणे असे प्रकार आता वाढले आहेत. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे. उत्पादनात मोठी घट येत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा भाव 9 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतातही तांदुळ आणि गव्हाचे दर वाढले आहे. सध्या जागतिक बाजारात तांदळाच्या किंमती 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहचल्या आहेत.