महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला
किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थिने वाद सुटल्यास चांगले होईल असे म्हटले आहे.
मुंबई : (Kirloskar Family Dispute) किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले अतुल चंद्रकांत किर्लोस्कर आणि अन्य 13 जनांना वाद मध्यस्थीने सोडवण्याचा आदेश दिला आहे. जर हा वाद मध्यस्थीने न सुटल्यास न्यायालयाला या प्रकरणात अंतरीम आदेश द्यावे लागतील असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालू होता. मुंबई उच्च न्यायलयाने देखील हा खटला कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने सोडवण्यात यावा असे म्हटले होते. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केबीएलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
केबीएलचे प्रमुख असलेले संजय किर्लोस्कर यांनी आरोप केला आहे की, त्यांचे भाऊ अतुल किर्लोस्कर आणि संजय किर्लोस्कर यांच्या मालकी अंतर्गत येणाऱ्या कंपन्या या किर्लोस्कर बँन्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप अतुल आणि राहुल यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, या खटल्याशी संबंधित पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यांना सर्वोच्च न्यायलयाच्या माजी न्यायाधीश इंदु मल्होत्रा यांची मध्यस्थी मान्य आहे. मात्र यातील दोन कंपन्या या मध्यस्थीसाठी तयार नाहीत. मध्यस्थी करायची असेल तर सर्व कंपन्यांमध्ये झाली पहिजे. अन्यथा सर्वोच्च न्यायलयाला अंतरिम आदेश द्यावे लागतील.
जुलैमध्ये सुरू झाला वाद
हा वाद मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून सुरू आहे. अतुल आणि राहुल किर्लोस्कर हे दोघे मिळून पाच कंपन्यांचे मालक आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या कंपन्यांची नवी ओळख तयार करण्यासाठी कंपन्यांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपनीचा लोगो, कलर आणि अन्य काही गोष्टी बदलण्यात आल्या. मात्र या पाच कंपन्याचा लोगो हा किर्लोस्कर यांनी 130 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीशी मिळता जुळता आहे. यातून संबंधित कंपन्यांनी 130 वर्षांची परंपरा असलेल्या किर्लोस्कर कंपनीची प्रतिमा चोरण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय किर्लोस्कर यांनी केला आहे.