Mukesh Ambani यांनी आता खरेदी केली ही कंपनी, कोका-कोला आणि पेप्सीला देणार टक्कर
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामुळे परदेशी कंपन्यांना ते सरळ टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत.
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani ) यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक धोरणं आखली आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक कंपन्या विकत घेतल्या आहेत. ज्यामध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. रिलायन्स ग्रुपने दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक ( Pure Drink ) ग्रुपसोबत 22 कोटी रुपयांची डील केली आहे. आता या ड्रिंकच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्तात पेय उपलब्ध करून देण्याची मुकेश अंबानी यांची योजना आहे. त्यामुळे आता ते थेट कोका-कोला आणि पेप्सिकोशी स्पर्धा करणार आहेत.
2 लिटरची किंमत फक्त 49 रुपये
रिलायन्सचे कोला ड्रिंक रिटेल आउटलेटवर देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे विदेशी ब्रँडच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. रिलायन्सच्या जियो मार्टमध्ये कॅम्पा कोलाच्या 2 लिटरच्या बाटलीची किंमत 49 रुपये आहे. कोका-कोलाच्या 1.75 लिटरच्या बाटलीची किंमत 70 रुपये आणि पेप्सीची किंमत 66 रुपये आहे.
परदेशी कंपन्यांवर मात
मुकेश अंबानी यांनी शीतपेयांच्या बाजारात आपला ठसा उमटवण्यासाठी कंपन्यांचे अधिग्रहण सुरू केले आहे. अंबानी हे गुजरातमधील 100 वर्षे जुनी शीतपेय कंपनी सोसियो मधील भागभांडवल विकत घेत आहेत. कोकाकोला, पेप्सी यांसारख्या विदेशी कंपन्यांना मात देण्यासाठी अंबानी मोठी योजना आखत आहेत.
दूरसंचार क्षेत्रानंतर शीतपेय क्षेत्रात पाऊल
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी अनेक दिवसांपासून बॅटल ऑफ कोलासची तयारी करत आहे. या कारणास्तव कंपनीने देशातील आघाडीच्या शीतपेय कंपन्यांमधील भागभांडवल विकत घेतले असून भारतात विदेशी कंपन्यांना मात देण्यासाठी ही योजना आखत आहे. दूरसंचार क्षेत्रानंतर सॉफ्ट ड्रिंक या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या जवळपास 68,000 कोटी रुपयांची शीतपेयांची बाजारपेठ आहे.
कॅम्पा कोलासोबत 22 कोटींचा करार
रिलायन्स रिटेलने कॅम्पा कोला ब्रँडसोबत 22 कोटी रुपयांचा करार केला आहे. यासोबतच गुजरातमधील 100 वर्षे जुनी शीतपेय कंपनी सोस्यो हझुरी बेव्हरेजेस (SHBPL) मधील 50 टक्के इक्विटी स्टेक घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.