एअरटेल, व्होडाफोन आयडियाला अच्छे दिन, कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी, केंद्राकडून दूरसंचार क्षेत्रासाठी पॅकेज मंजूर, सूत्रांची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसांठी पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राकडून पॅकेज मंजूर झाल्याचं कळताच टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसांठी पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राकडून पॅकेज मंजूर झाल्याचं कळताच टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. सर्वाधिक शेअर्स भारती एअरटेलचे वाढले आहेत. काही वेळापूर्वी भारती एअरटेलचा शेअर 732.80 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर गेल्या पाच दिवसात एअरटेलचा शेअर्स 45 रुपयांनी वाढला आहे. केंद्राच्या पॅकेजचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला झाल्याचं दिसून आलं आहे. दुपारी एक पर्यंत व्होडाफोनचा शेअर 9 रुपये 30 पैशांनी वधारला. तर, गेल्या एक महिन्यात व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये 50.42 टक्के तेजी आली आहे.
पॅकेजमध्ये नेमकं काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम कंपन्यांनी एजीआरची थकीत रक्कम जमा करण्यास मुदतवाढ मागितली होती. टेलिकॉम कंपन्यांना 4 वर्षांपर्यंत वेळा दिला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देतील.
बीएसएनल-एमटीएनला ही दिलासा मिळणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसएनल आणि एमटीएनला देखील केंद्र सरकार दिलासा देऊ शकतं. बीएसएनल आणि एमटीएनल वरील कर्ज इक्विटीमध्ये बदलण्यास केंद्र सरकार मंजुरी देऊ शकतं अशी माहिती आहे. आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलंम बिर्ला यांनी जून 2021 रोजी कर्जात बुडालेली व्होडाफोन आयडिया कंपनीतील हिस्सा सरकारकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय व्होडाफोन आयडिया कंपनीचा काही हिस्सा वित्तीय संस्थेकडे सोपवण्याची तयारी करण्यात आली होती. ब्रिटनच्या व्होडाफोन कंपनीनं भारतातील बिर्ला ग्रुपसोबत एकत्रित येऊन व्होडफोन आयडिया लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली होती.
50 हजार कोटींपेक्षा अधिक थकबाकी
ब्रिटनची व्होडाफोन आणि भारतातील बिर्ला ग्रुपच्या आयडिया कंपनीनं एकत्र येत व्होडाफोन आयडिया कंपनी स्थापन केली होती. या कंपनीला विविध वैधानिक कामांसाठी सरकारचे 50,400 कोटी रुपये द्यायचे आहेत. मात्र, व्होडाफोन आयडिया कंपनीची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. 31 मार्च 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीवर 1 लाख 80 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. यामध्ये सुमारे 96270 कोटी रुपये स्पेक्ट्रम शुल्काचे आहेत. बँकांची थकबाकी 23 हजार कोटींच्या जवळपास आहे आणि एजीआरची थकबाकी 58254 कोटी आहे. कंपनीने एजीआर थकबाकीमध्ये आतापर्यंत फक्त 7854 कोटी भरले आहेत. तरीही कंपनीला 50 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करायची आहे.
इतर बातम्या:
स्पाईसजेटची मोठी घोषणा, 38 नव्या मार्गांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुरु करणार
EPFO पोर्टलवरुन जुन्या खात्यातून नव्या खात्यात PF ऑनलाईन ट्रान्सफर कसा करायचा? वाचा सोप्या टिप्स