PF होल्डरच्या मृत्यूनंतर नॉमिनीला सहज मिळणार पैसा?; कोणता नियम बदलला?
एखाद्या पीएफ अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पैसा मिळवण्यासाठी नॉमिनीला म्हणजे त्याच्या वारसाला मोठी कसरत करावी लागले. कधी कधी खातेधारकाची अकाऊंटवरील माहिती आणि त्याच्या पीएफ अकाऊंटची माहिती याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे वारसाची अडचण होते. पैसा मिळण्यास विलंब होतो. मात्र, आता यातून सुटका झाली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)च्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ अकाऊंट होल्डरांसाठी डेथ क्लेमच्या नियमात आता बदल झाला आहे. ईपीएफओने त्याबाबतची माहिती एका सर्कुलर जारी करून दिली आहे. या नियमानुसार, जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला आणि त्याचं आधार पीएफ अकाऊंटशी लिंक नसेल किंवा आधार कार्डावरील माहिती पीएफ अकाऊंटशी मॅच करत नसतील तरीही त्याचा पैसा त्याच्या नॉमिनीला दिला जाणार आहे. या मोठ्या बदलामुळे आता डेथ क्लेम सेटलमेंट करणं सोपं झालं आहे.
या आधी आधार कार्डातील विवरणातील एखादी चूक, किंवा तांत्रिक अडचणीच्या कारणाने आधार निष्क्रिय झालं असेल तर अशा परिस्थितीत डेट क्लेम करणं अत्यंत कठिण होऊन जायचं. त्यामुळे पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर आधारची डिटेल्स मॅच जुळवण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे खातेधारकाच्या नॉमिनीला म्हणजे वारसाला पैसे मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागायची.
खातरजमा करणार
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, मृत्यूनंतर आधारमधील डिटेल्स दुरुस्त करता येत नाही. त्यामुळेच भौतिक सत्यापनाच्या आधारे नॉमिनीला खातेधारकाची रक्कम दिली जाणार आहे. पण त्यासाठी विभागीय अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. विभागीय अधिकाऱ्याची संमती असल्याशिवाय नॉमिनीला एक पै सुद्धा दिला जाणार नाही. कोणतीही फसवणूक किंवा बोगसगिरी होऊ नये म्हणून ईपीएफओने विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. या नियमांतर्गत जे नॉमिनी कुटुंबातील आहेत, त्याची पूर्ण खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतरच त्याला पैसे दिले जाणार आहेत.
तर वेगळा मार्ग
एखाद्या पीएफ अकाऊंटधारकाची आधार कार्डावरील माहिती चुकीची असेल तरच हा नियम लागू होईल. जर सदस्याची माहिती ईपीएफओ यूएएनकडे नसेल तर पैसे मिळवण्यासाठी नॉमिनीला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
नॉमिनीचं नाव नसेल तर…
खातेधारकाने नॉमिनीचं नाव दिलं नसेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर खातेधारकाचे पैसे कायदेशीररित्या खातेधारकाच्या वारसाला दिले जाणार आहे. त्यासाठी वारसाला त्याच्या आधारकार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे.