Paytm आणि UPI बाबत मोठी अपडेट; आता ग्राहकांची चिंता दूर
पेटीएमच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूश खबर आहे. पेटीएमला आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडरचे लायसन्स मिळाले आहे. त्यासोबतचं आता पेटीएमचे चार मोठ्या बँकासोबत टायअपही झाले आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा सुरूच राहणार असून या निर्णयामुळे पेटीएमच्या ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे.
नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : पेटीएमची सेवा सुरू राहील की बंद या विवंचनेत असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आता ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे. कारण पेटीएमची सेवा सुरूच राहणार आहे. पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडरचे लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे पेटीएमच्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व ग्राहकांची यूपीआय पेमेंट सर्व्हिसही पूर्वी सारखीच सुरू राहणार आहे. कारण आरबीआयच्या बॅनचा परिणाम केवळ पेटीएम पेमेंट्स बँकेवर होणार आहे. पेटीएमवर होणार नाहीये.
एनपीसीआयने गुरुवारी एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, पेटीएमला मल्टी बँक मॉडलनुसार यूपीआय पेमेंटचे थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरचे लायसन्स मिळालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ पेटीएम प्लॅटफॉर्मवरून आता ग्राहक गुगल पे, फोन पे, भारत पे अॅपसारखं यूपीआय सर्व्हिसचा वापर करू शकतील. फक्त त्यांचे खाते पेटीएम पेमेंट्स बँकेशी अटॅच असता कामा नये.
चार मोठ्या बँकाशी टायअप
एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक आदी चार बँकानी पेटीएमसोबत टायअप केला आहे. वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएमसाठी पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरप्रमाणे या चारही बँका काम करणार आहेत. तर येस बँक पेटीएमसाठी सध्याच्या आणि नव्या यूपीआय मर्चंट्सचे अधिग्रहण करणाऱ्या बँकेप्रमाणे काम करेल.
काही बदल
पेटीएमच्या ग्राहकांसाठी आता आणखी एक बदल करण्यात आला आहे. ज्या लोकांच्या पेटीएमवर यूपीआय आयडीच्या शेवटी @Paytm लिहिण्यात आलं आहे, आता ते बदलून @YesBank करण्यात येणार आहे. त्याशिवाय पेटीएमचे विद्यमान ग्राहक आणि मर्चंट्स पूर्वीप्रमाणेच यूपीआय ट्रान्जेक्शनसारखी काम करेल. यूपीआय अकाऊंटवर अॅक्टिव्ह ऑटो पेमेंट सर्व्हिसही सुरूच राहील. एनपीसीआयने वन97 कम्युनिकेशन्सला लवकरात लवकर मायग्रेशन पूर्ण करण्यास सांगितलं आहे. या सर्व बदलामुळे पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.