पूर्व-मध्य रेल्वे मालामाल; प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली, उत्पन्नात 49 टक्क्यांची वाढ
पूर्व-मध्य रेल्वेच्या उत्पन्नात यावर्षी मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान रेल्वेचे उत्पन्न जवळपास 49 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या आठ महिन्यांत रेल्वेला प्राथमिक उत्पन्नातून 14184.38 कोटी रुपये मिळाले आहेत.
नवी दिल्ली: पूर्व-मध्य रेल्वेच्या उत्पन्नात यावर्षी मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान रेल्वेचे उत्पन्न जवळपास 49 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या आठ महिन्यांत रेल्वेला प्राथमिक उत्पन्नातून 14184.38 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पूर्व -मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांमध्ये रेल्वेला केवळ 9534.19 कोरी रुपयांची प्राप्ती झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल 48.77 टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ
गेल्या वर्षी देशावर कोरोनाचे संकट होते, कोरोनाचा फटका रेल्वेला देखील बसला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये तर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली, मात्र यामुळे रेल्वेच्या उत्पनावर मोठा परिणाम झाला. परंतु चालू वर्षी रेल्वे वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील दुपटीने वाढली आहे. गेल्या वर्षी प्रवाशांच्या भाड्यातून रेल्वेला केवळ 810.10 कोटी रुपयांची प्राप्ती झाली होती. मात्र या वर्षी तेच प्रमाण 1620.11 कोटी रुपये आहे. म्हणजेच प्रवाशांकडून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नामध्ये दुपटीची वाढ झाली आहे.
सामानाची वाहतूक 21 टक्क्यांनी वाढली
केवळ प्रवाशी वाहतुकीतूनच नाही तर, सामान वाहतुकीतून देखील चालू आर्थिक वर्षामध्ये रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व सेवा ठप्प असल्यामुळे मालाची वाहतूक देखील बंद होती. मात्र यंदा लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे माल वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये मध्य-पूर्व रेल्वेने तब्बल 104.56 मिलियन टन मालाची वाहतूक केली आहे. मागच्या वर्षी हेच प्रमाण 86.76 मिलियन टन एवढे होते. म्हणजे माल वाहतुकीमध्ये देखील वीस ते एकवीस टक्क्यांची वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या
आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; …या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या
‘हे’ आहेत सर्वोत्तम पाच क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्यांचे फायदे
तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक