खात्यात बॅलन्स नसताना, बँक देईल मोठी रक्कम, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा उठवा फायदा, तारण ठेवा आणि सुविधा मिळवा
संकटकाळात मदतीला धावून येतो, तोच मित्र. आपत्कालीन परिस्थिती आपल्याला पैशांची निकड असताना नातेवाईक अथवा मित्रांकडून उसनवारी करण्याची पद्धत प्रचलित आहे. तुमची बँक ही मदतीला धाऊन येऊ शकते. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही पैसे काढू शकता. निकडीच्या काळात ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा होतो. जाणून घेऊयात या सुविधेविषयी...
खात्यात पैसे नसताना अथवा कवडी नसतानाही खातेदार खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी या सुविधेची माहिती असणे गरजेचे आहे. कडकीच्या काळात मदत करण्यासाठी लवकर कोणी पुढे येत नसेल आणि बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे अल्प मुदतीचे कर्जच म्हणा ना. या सुविधेत चालू खाते, वेतन खाते अथवा मुदत ठेवीवर ओव्हरड्राफ्ट मिळतो. सर्व सरकारी आणि खासगी बँका ही सुविधा देतात. शेअर्स, विमा, बॉंड्स, मालमत्ता यावरही ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. त्याची माहिती बँकेत गेल्यावर मिळेल.
तारण ठेवा, ओव्हरड्राफ्ट मिळवा
ओव्हरड्राफ्टसाठी तुम्हाला बँकेला काहीतरी तारण द्यावे लागते. त्यात मुदत ठेव, रोखे किंवा शेअर्स, त्यांच्या प्रमाणात ओव्हरड्राफ्टतंर्गत रक्कम काढता येते. आपत्कालीन परिस्थितीत कर्ज मिळविण्यासाठी तुमची धडपड सुरु असते. त्यापेक्षा ही कमी वेळेत तुम्हाला या सुविधेतून रक्कम मिळू शकते. त्यासाठी व्याज द्यावे लागते. वेतन खात्यात जमा होणा-या रकमेवर ही ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. कर्जासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज दाखल करावा लागतो. जर बँकेत एफडी असेल, बाँड, शेअर, विमा यामध्ये चांगली गुंतवणूक असेल तर ओव्हरड्राफ्टचा फायदा घेता येतो. ओव्हरड्राफ्ट गरजेच्या वेळी मदतीला धाऊन येतो. हे एक प्रकारचे कर्ज आहे.
जे व्याजासहित परत करावे लागते. अचानक वाढलेला खर्च यातून भागविता येतो. ओव्हरड्राफ्टची मर्यादा अगोदरच ठरलेली असते. कर्ज घेताना, उसनवारी करताना धनादेश देण्याची प्रथा अलीकडे रुजली आहे. हमी म्हणून धनादेश घेण्यात येतो. परंतु, वेळेत कर्ज रक्कम न चुकती केल्यास, त्यावरील व्याज अदा न केल्यास धनादेश दिल्याने तुम्ही कायदेशीर अडचणीत अडकू शकता. धनादेश अनादर झाल्यास (Cheque dishonour, bounce) तुम्हाला दंड अथवा शिक्षा आणि दोन्हींचा सामना करावा लागू शकतो. परंतु, ओव्हरड्राफ्ट सुविधेत हा धोका टळतो. पण पत राखण्यासाठी वेळेत ओव्हरड्राफ्ट रक्कम परत करणे केव्हाही चांगले.
एफडीसह वेतनावर रक्कम
समजा बँकेत तुमची 4 लाखांची एफडी असेल तर तुम्हाला 3 लाखांपेक्षा अधिकचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. वेतनावरही बँक ओव्हरड्राफ्ट देते. वेतनाच्या तीन पट ओव्हरड्राफ्ट रक्कम मिळू शकते. परंतु, त्यासाठी संबंधित बँकेतच तुमचे वेतन जमा होणे गरजेचे आहे. समजून घ्या तुम्हाला एसबीआयमधून ओव्हरड्राफ्ट सुविधा घ्यायची असेल तर याच बँकेत तुमचे वेतन जमा होणे गरजेचे आहे. ओव्हरड्राफ्टसाठी किमान 6 नियमीत वेतन बँकेत जमा होणे गरजेचे आहे. एफडी, शेअर, ब्रॉड आणि वेतनाच्या प्रमाणात ओव्हरड्राफ्ट रक्कम कमी- अधिक होते.
संयुक्तपणे घेता येईल लाभ
ओव्हरड्राफ्टचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या सुविधेचा लाभ संयुक्तपणे घेता येईल. यामध्ये ओव्हरड्राफ्ट अंतर्गत मिळणारी रक्कम भरण्याची जबाबदारी दोघांची असेल. जर यातील एक जण रक्कम भरण्यास सक्षम नसेल तर दुस-या व्यक्तीला संपूर्ण रक्कम भरावी लागेल. विशेष म्हणजे कर्ज भरण्यास तुम्ही सक्षम नसाल तर तारण ठेवलेली वस्तू तुम्ही गमावू शकता. तारण ठेवलेली रक्कम व्याजासहित परतफेडीच्या रक्कमेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला उर्वरीत रक्कमही भरावी लागेल. रक्कम वेळेत न जमा केल्याने तुमची पत खालावेल ती वेगळी बाब.
संबंधित बातम्या : EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया
नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ