Petrol-Diesel Price Today: अहो आश्चर्यम! सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol & Diesel | यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने हे इंधन स्वस्त होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.
मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने हे इंधन स्वस्त होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा सुरु आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता.
मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही.
केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यास पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही. परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर न वाढवताही 32 रुपयांची दरवाढ
गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दरात एका पैशाचीही वाढ केलेली नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले. मात्र, एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 32 रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे बोट दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. तसेच राज्यांकडून पेट्रोल आणि डिझेलवर कर लादला जातो. त्यामुळे इंधनाच्या दरात इतकी वाढ झाल्याचे सिंग पुरी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?