तेल उत्पादक देशांच्या बैठकीकडे जगाचे लक्ष, भारतीयांना पेट्रोल-डिझेल दरवाढीपासून दिलासा मिळणार?
Crude Oil | पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात होईल. या चर्चेअंती अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवल्यास खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होईल. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमती कमी होतील. परिणामी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घटून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओपेक या संघटनेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. 1960 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर या संघटनेचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संघटनेने आगामी बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास खनिज तेलाचे दर कमी होतील.
याशिवाय, पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात होईल. या चर्चेअंती अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवल्यास खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होईल. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमती कमी होतील. परिणामी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घटून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.
भारतात पेट्रोल आणि डिझेलने सध्या शंभरी गाठली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले होते. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 35 आणि 36 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 105.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 108.64 आणि 97.38 रुपये इतका आहे.
अमेरिका-इराण चर्चेमुळे खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण
अमेरिका आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय चर्चा सकारात्मक होण्याच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. ही बाब खनिज तेलाच्या बाजारपेठेसाठी नकारात्मक असली तर भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांच्यादृष्टीने सकारात्मक मानली जात आहे. यामुळे भारतात शंभरीपार गेलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील, असा अंदाज आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना याचा फायदा देणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला होता. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 86 डॉलर्सवर पोहोचली होती. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत क्रूड ऑईलच्या किंमतीमध्ये घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
संबंधित बातम्या:
तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!