R Thyagarajan : कोणाला नकोय असा बॉस! 62 अब्ज संपत्ती कर्मचाऱ्यांसाठी ठेवली राखून, कोण आहेत हे भारतीय टायकून
R Thyagarajan : आपली 62 अब्ज संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटणारा मालक कधी तुम्हाला भेटला आहे का? दिवाळीत गुजरातमधील हिरे व्यापारी कर्मचाऱ्यांना कार, पैसे देतात. पण इतकी मोठी संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करणारा मालका विराळाच म्हणावा लागेल, नाही का?
नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : आपली 62 अब्ज संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटणारा मालक (Donate Wealth) कधी तुम्हाला भेटला आहे का? तुमच्या मालकाने कधी आपुलकीने एक छोटीशी का असेना शाबसकी दिली तरी मुठभर मास अंगावर चढतं. इथं तर या मालकाने थोडी थोडकी नव्हे तर 62 अब्ज संपत्ती वाटप केली. दिवाळीत गुजरातमधील हिरे व्यापारी (James Traders) कर्मचाऱ्यांना कार, पैसे देतात. काही जण फ्लॅटही खरेदी करुन देतात, अशा अनेक वृत्त आपण वाचली आहेत. त्या वृत्तांमुळेच अनेक कर्मचाऱ्यांना हुरुप आला. आपल्या कामाची दखल घेतली जाणे आणि कर्मचारी म्हणून कंपनीने दखल घेणे, हा भाव पैशांनी विकत घेता येत नाही. यामुळे कर्मचारी आणि मालकातील अबोल संवादाला आपुलकीचा ओलावा मिळतो. इतकी मोठी संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करणारा मालका विराळाच म्हणावा लागेल, नाही का?
श्रीराम फायनान्सचे नाव ऐकलंय का?
गेल्या काही वर्षांत वाहन खरेदी करताना अनेक खासगी वित्तीय सेवा कंपन्या समोर येतात. त्यात श्रीराम फायनान्सचे पण नाव दिसते. श्रीराम फायनान्स उभी करणारे आर त्यागराजन हे जगातील मोजक्या वित्त पुरवठादारांपैकी एक मानण्यात येतात. त्यांचा अब्जावधींचा व्यवसाय आहे. श्रीराम समूहाने मोठी झेप घेतली आहे. भारतातील अनेक निम्न शहर, खेड्यापर्यंत ही कंपनी पोहचली आहे.
एक लाखांहून अधिक जणांना नोकरी
भारतातील मध्यमवर्ग आणि गरीबांना ट्रक, टॅक्टर वा इतर वाहन खरेदीसाठी त्यागराजन यांच्या श्रीराम समूहाने आर्थिक पुरवठा केला. हा समूह विमा, कर्जच नाही तर स्टॉक ब्रोकिंगसह अनेक सेवा उद्योगात अग्रेसर आहे. या समूहाने 1,08,000 जणांना रोजगार दिला. अनेकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे बळ दिले.
शेअर बाजारात उसळी
शेअर बाजारात पण या समूहातील अनेक कंपन्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. बाजारात चढउताराचे सत्र असतानाही कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखवला.समूहातील अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात यंदा 35 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. जुलै महिन्यात या कंपन्यांनी रेकॉर्ड तयार केला. भारतीय बेंचमार्क स्टॉक इंडेक्सपेक्षा ही उडी चार पट अधिक आहे.
1974 मध्ये मुहूर्तमेढ
1974 मध्ये त्यांनी या समूहाची मुहूर्तमेढ रोवली. चेन्नईत त्यांनी कंपनीची स्थापना केली. आपण डाव्या विचारणीचे असल्याचे त्यागराजन सांगतात. त्यामुळेच भांडवलवादापेक्षा समाजवादावर त्यांची निष्ठा अधिक आहे. गरीब लोकांना कोणीच कर्ज देत नसल्याने त्यांनी हा पर्याय निर्माण केला. समृद्ध, श्रीमंत शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण समाजवादामुळे त्यांना गरिबांना मदतीचा हात देता आला. त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्ससह काही ठिकाणी नोकरी पण केली.
समूहात 30 हून अधिक कंपन्या
श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. त्यातील प्रमुख श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे. जूनच्या तिमाहीत या कंपनीने जवळपास 200 दशलक्ष डॉलरचा नफा कमावला.
कर्मचाऱ्यांसाठी ट्रस्ट
त्यागराजन यांनी काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केले. त्यांनी मोबाईल सुद्धा वापरला नाही. साध्या राहणीमानावर त्यांचा आजही मोठा विश्वास आहे. त्यांच्याकडील 750 Million Dollar (62,166,225,000 भारतीय रुपये) त्यांनी या ट्रस्टच्या नावे केले. 2006 साली ही ट्रस्ट अस्तित्वात आली होती. अनेक सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा फायदा होतो.