Ratan Tata Birthday : इतक्या मोठ्या समूहाचे मालक असताना पण रतन टाटा का नाही सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
Ratan Tata Birthday : भारताच्या उद्योग क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व रतन टाटा यांचा साधेपणा, देशभक्ती यांचे अनेक किस्से आहेत. पण त्यांनी श्रीमंतीचा कधी बडेजाव केला नाही. त्यांची कंपनी ही सर्वाधिक मौल्यवान कंपनी आहे. तरीही ते श्रीमंत का नाहीत?
आज रतन टाटा यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यांनी IBM ची नोकरी सोडून 1961मध्ये ते टाटा समूहात परतले. टाटा समूहात त्यांनी उमेदवारी केली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूह जगातील बड्या कंपन्यांच्या यादीत दाखल झाली. रतन टाटा यांनी टाटा समूहाला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या समूहाने मोठी कमाई केली. पण तरीही रतन टाटा वैयक्तिकरित्या कधी सर्वात श्रीमंत उद्योगपती नाही ठरले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या समूहाचा मालक पण श्रीमंतांच्या यादीत का नाही आले?
रतन टाटा यांची संपत्ती आणि फोर्ब्सची यादी
टाटा समूहात 100 हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. सुईपासून ते स्टील आणि चहापासून ते हवाई जहाजपर्यंत व्यापार करतात. तरीही IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच यादी 2022 नुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती 3,800 कोटी रुपये आहे. या यादीत ते 421 व्या स्थानावर आहेत.
टाटा ट्रस्ट आणि समाज सेवा
रतन टाटा यांच्या नावावर संपत्ती न होण्याचे आणखी एक कारण त्यांनी समाज सेवेला प्राधान्य दिले. टाटा समूहाची जास्तीत जास्त संपत्ती “टाटा सन्स” यांच्याकडे आहे. ही या समूहाची प्रमुख कंपनी आहे. टाटा सन्सच्या नफ्यातील एक मोठा वाटा, टाटा ट्रस्टला देण्यात येतो. आरोग्य, शिक्षा, रोजगार आणि सांस्कृतिक वारसासह परोपकारी, सामजिक कार्यासाठी ही रक्कम उपयोगात येते.
टाटा ट्रस्टचे देशात सामाजिक सुधारणेसाठी आर्थिक मदत करते. रतन टाटा यांनी व्यक्तिगत संपत्ती जमा करण्याऐवजी समाजात सुधारणा करण्यासाठी जोर दिला. त्यांनी दानधर्मातून नाव उंचावले. संपत्तीचा बडेजाव केला नाही.
श्रीमंतांच्या यादीत मागे कसे?
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी सारखे उद्योगपती, यांची संपत्ती ही व्यक्तिगत लाभावर केंद्रित आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. तर रतन टाटा यांची संपत्ती ही टाटा ट्रस्टला जाते. ती थेट त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमा होत नाही. त्यामुळे ते कधी श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर दिसले नाही. टाटा कुटुंबाने नेहमीच समाज कल्याण आणि समृद्धीला प्राथमिकता दिली आहे. हाच वारसा रतन टाटा यांनी पुढे सुरू ठेवला आहे. त्यांचे नेतृत्व आणि दानशूरता यामुळे ते अनेकांचे आदर्श आहेत